

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शासन निर्देशानुसार संसर्ग काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत विविध निर्बंध लागू करण्यात आले होते. दरम्यान सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती मर्यादेसह अन्य नियमांचे उल्लंघन करणार्या ४६ हजारांहून अधिक व्यक्ती, ३९ संस्था, प्रतिष्ठांनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईपोटी शासन तिजोरीत तब्बल १ कोटी ४९ लाख ३८ हजार ५७५ रूपयांचा महसूल जमा झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. जिल्ह्यासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून सर्वांनाच संसर्ग प्रादूर्भावाच्या पहिल्या व दुसर्या लाटेचा सामना करावा लागला आहे.
सद्यस्थितीत ओमायक्रॉन विषाणू प्रादूर्भाव होत असून तिसर्या लाटेचे संकटामुळे राज्यासह जळगाव जिल्हा पुन्हा लॉकडाउन वा संचारबंदीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. मार्च २०२० ते आतापर्यंतच्या काळात शासन निर्देशानुसार वेळोवेळी साथरोग आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रशासनातर्फे जिल्हा प्रशासनासह संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली.
या दरम्यान फेब्रुवारी २०२१ ते सद्यस्थितीत प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत सार्वजनिक जागी थुंकणार्या ४६ हजार ६८६ नागरिकांवर प्रत्येकी २०० रूपये प्रमाणे १ कोटी १८ लाख २० हजार ५ रूपये तर उपस्थिती मर्यादेचे उल्लंघन करणार्या ९ हजार ५६९ नागरिकांकडून २९ लाख ९१ हजार ५७० तसेच संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणारे मंगल कार्यालये, नाट्यगृह, बार, मॉल्स, सिनेमागृह अशा ३९ संस्थांकडून १ लाख १९ हजार रूपये दंडात्मक कारवाईसह संबंधितांवर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहा व्हिडिओ : 5 दिवसांचा प्रवास आणि गव्याच्या सुटकेचा थरार