Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा नाशिक येथील रहिवासी असलेल्या वृद्ध दाम्पत्यास त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाल्याची घटना (दि.16) घडली. या प्रकरणी त्र्यंबक पोलिस ठाण्यात तीन कर्मचाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे तक्रार?

  • दर्शनावेळी वृद्द दाम्पत्यास देवस्थानच्या कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार आहे.
  • पोलिसांत तीन कर्मचाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
  • या घटनेनंतर भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नेमकं घडलं काय?

महेंद्र सुर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार ते रविवारी सकाळी ते पत्नी छाया यशवंत सुर्यवंशी वय 62 वर्ष राहणार नाशिक या वृध्द महिलेला सिक्युरिटी सुपरवायझर असलेल्या देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्याने धक्का दिल्याने ती पायऱ्यांवरून पडली व तीला दुखापत झाली. त्यानंतर झालेल्या वादात देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी महेंद्र यांना माराहाण केली व शिवीगाळ केली. मंदिर तुमच्या बापाचे आहे का? असे म्हणत दमबाजी केली म्हणून योगेश इंद्रजीत सोलंकी व अन्य तीन कर्मचारी यांच्या विरूध्द त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत त्र्यंबक पोलीसांनी अदखलपात्र नोंद केली आहे. छाया सुर्यवंशी या वयोवृध्दा चारधाम यात्रा करून त्र्यंबकेश्वरला आलेल्या होत्या. सोबत त्यांनी तीर्थ आणले होते. ते वाहण्यासाठी त्यांनी तेथे उभे असलेल्या कर्मचा-याकडे देण्याचा प्रयत्न केला मात्र अशा प्रकारे तीर्थ फुल वाहायचे नाही असे सांगितले व त्यानंतर नमस्कार करण्यासाठी देखील वेळ न देता धक्का मारत बाजूला केले. यामुळे सुर्यवंशी कुटुंब व्यथीत झाले. या बाबत महेंद्र यांनी असे करू नका असे सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना देखील ढकलण्यात आले व मारहाण केली.

भाविकांमध्ये नाराजी

दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी दिवसोंदिवस वाढते आहे. गर्भगृहात दर्शन घेतांना धक्का मारत बाजूला केले जाते अशी भाविकांची तक्रार असते. चार ते पाच तास रांगेत उभे राहील्या नंतर गर्भगृहाच्या समोर हात जोडण्यासाठी भाविक येतात तेव्हा तेथे असलेले कर्मचारी धक्का मारतात व बाजूला करतात म्हणून नेहमीच वाद होत असतात. रविवारी या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भाविक दर्शनासाठी येतात. भगवतांचा आशिर्वाद घेण्यासाठी येतात मात्र त्यांना येथे मार आणि शिव्या खाण्याची नामुश्की येते. याबाबत तीव्र पडसाद उमटले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडूनही दखल

सोमवारी सकाळी नाशिक जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांची पूर्वनियोजीत बैठक देवस्थान मध्ये आयोजीत केलेली होती. त्यांच्या या भेटीच्या दरम्यान भाविकांच्या मारहाणीचा प्रकार समोर आला असता त्यांनी सी.सी.टी.व्ही.फुटेज पाहणी केली. येथील दर्शनाच्या नियोजनाच्या बाबतीत काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. तसेच भाविकांना मारहाण झाल्याच्या घटनेची गांभिर्याने दखल घेतली आहे. संबंधीत कर्मचा-यावर कठोर कारवाई होईल संकेत यामधून मिळाले आहेत. विश्वस्तांच्या कार्यपध्दतीवर देखील अधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत महेंद्र सुर्यवंशी यांनी भाविक काही तास-दोन तास येथे थांबण्यासाठी येत नाहीत. देवापुढे हात जोडत प्रार्थना करतात व बाहेर पडतात मात्र त्यांना तेवढी देखील संधी मिळत नाही. याबाबत देवस्थानने गांभिर्याने विचार करावा असे सांगितले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे सुपरवाझर पदावर असलेली व्यक्ती मारहाण करते आणि पोलीस ठाण्यात तशी कबुली देत मी आगोदर फटका मारला असे सांगत आहे. हा सर्व प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्या सोबत घडला अन्य कोणत्याही भाविकांसोबत घडायला नको असे म्हटले आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news