Police Recruitment | CCTV च्या निगराणीत बुधवारपासून पोलिस भरती; अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील मोबाईल वापरास बंदी

संग्रहित
संग्रहित

धुळे पुढारी वृत्तसेवा– धुळ्यात 19 ते 23 जून दरम्यान पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली असून त्यांचे नातेवाईक किंवा संबंधित कुणीही भरती प्रक्रियेत नसल्याचे बंधपत्र भरून घेण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नसून भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

धुळ्यात पोलीस कवायत मैदानावर होणाऱ्या या भरती प्रक्रिये दरम्यान आवश्यक ती सर्व तयारी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भरती प्रक्रियेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना मैदानाची पाहणी देखील केली. यावेळी त्यांच्या समवेत उपअधीक्षक शिल्पा पाटील तसेच राजा पटेल व अन्य कर्मचारी उपस्थित होते. या भरती संदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले की, पोलीस भरती अंतर्गत धुळे जिल्हा पोलीस घटकासाठी एकुण २४७५ अर्ज प्राप्त झाले असून त्यात १९०३ पुरुष, २६ माजी सैनिक व ५४६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पोलीस भरतीची मैदाणी चाचणी दिनांक १९ जुन ते २३ जुन दरम्यान घेण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी ५०० उमेदवारांना शारिरीक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी करीता बोलावण्यात येणार असून शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांना बोलविण्यात आले आहे.

सीसीटीव्ही व बायोमेट्रिक हजेरी

पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत तठस्थपणे, निपक्षपातीपणे व पारदर्शक पध्दतीने पार पडणार आहे. त्यासाठी मैदानावर प्रत्येक ईव्हेन्टकरीता सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच बायोमॅट्रीक पध्दतीने उमेदवारांची हजेरी घेण्यात येवून त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. जेणेकरुन भरती प्रक्रियेत डमी उमेदवाराचा समावेश होणार नाही याची पुर्ण दक्षता घेण्यात आली आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत भाग घेतलेल्या उमेदवारांची प्रथम ५० गुणांची मैदाणी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात १०० मीटर, १६०० मीटर धावणे व गोळाफेक अशा प्रकारांचा समावेश आहे. मैदाणी चाचणीत उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. तसेच मैदाणी चाचणीमध्ये कमीत कमी ५० टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून प्रवर्गनिहाय १:१० या प्रमाणानुसार उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. लेखी परिक्षा ही १०० गुणांची मराठी भाषेत घेण्यात येणार असून तीचा कालावधी ९० मिनीटांचा असणार आहे. त्यात अंकगणित, सामान्यज्ञान, चालु घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी व मराठी व्याकरणाचा समावेश असणार आहे. लेखी परिक्षा ही ओएमआर पध्दतीने घेण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना लेखी परिक्षेमध्ये देखील किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार हे अपात्र ठरणार आहेत.

मोबाईल वापरावर बंदी

भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस आल्यास उमेदवारांना त्यांचे शारिरीक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदाणी चाचणी साठी पुढील तारखेबाबत नियोजन करण्यात येईल.
भरती प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे नातेवाईक परिचयाचे उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये सहभागी नाहीत याबाबतचे लेखी बंधपत्र घेण्यात आले आहे. तसेच बंदोबस्तातील अधिकारी ,अंमलदार यांना भरती प्रक्रिये दरम्यान मोबाईल फोन न वापरण्याबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.

पोलीस भरती करीता उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच भरती प्रक्रिया हो अत्यंत पारदर्शकपणे पार पडणार असून उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. तसेच कोणीही प्रलोभन देत असेल तर उमेदवारांनी त्याबाबत तात्काळ उपस्थित वरिष्ठांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news