दोनशे वर्षांनंतर कझाकस्तानच्या कुरणात परतले जंगली घोडे | पुढारी

दोनशे वर्षांनंतर कझाकस्तानच्या कुरणात परतले जंगली घोडे

लंडन : तब्बल दोनशे वर्षांनंतर आता जंगली घोडे पुन्हा एकदा कझाकस्तानच्या गवताळ मैदानांमध्ये परतले आहेत. अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतर आता प्रथमच नामशेष होत असलेले जंगली घोडे ‘गोल्डन स्टेप ऑफ कझाकस्तान’मध्ये पुन्हा परत आले आहेत. प्राग प्राणिसंग्रहालयाच्या एका मोहिमेत सात झेवाल्स्की घोड्यांना युरोपमधून मध्य आशियातील या देशात जूनच्या प्रारंभी एअरलिफ्ट करून आणण्यात आले. आता दोन आठवड्यांनंतर ते याठिकाणी चांगलेच रमले असल्याचे दिसून आले आहे.

हे घोडे याठिकाणी मोकळेपणाने फिरत असून, त्यांची प्रजननाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या घोड्यांच्या संवर्धनाच्या मोहिमेला चांगले यश मिळेल, असे प्राग प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना वाटते. प्रवक्ते फिलिप मासेक यांनी सांगितले की, ही नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती आता आपल्या पूर्वजांच्या भूमीत परतली आहे. 1960 च्या दशकात ही प्रजाती जंगलांमध्ये लुप्त झाली होती. मंगोलियामध्ये या घोड्यांना शेवटचे पाहण्यात आले होते. आता मात्र हे घोडे पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परत आले असून, तिथे ते तत्काळ रमलेही आहेत.

गेल्या काही दशकांच्या काळात चीन व मंगोलियामध्ये या घोड्यांना पुन्हा आणण्यात आले होते. आता कझाकस्तानातही हे घोडे पुन्हा आले आहेत. घोड्यांची ही प्रजाती मूळची मध्य आशियातीलच असून, संशोधनासाठी त्यापैकी काही घोडे पाश्चात्त्य देशांमध्ये नेण्यात आले होते. आता या मोहिमेतून त्यांना पुन्हा आपल्या भूमीत नेण्यात आले आहे. भारतातूनही अनेक वर्षांपूर्वी चित्ते लुप्त झाले होते. आता अशीच मोहिम राबवून काही आफ्रिकन चित्त्यांना पुन्हा एकदा देशात आणण्यात आले होते. मध्य प्रदेशातील अभयारण्यात आता या चित्त्यांची संख्याही वाढत आहे.

Back to top button