धुळे: शिवसेना शिंदे गटाचे महावितरण कार्यालयासमोर अनोखे आंदोलन | पुढारी

धुळे: शिवसेना शिंदे गटाचे महावितरण कार्यालयासमोर अनोखे आंदोलन

धुळे: पुढारी वृत्तसेवा: वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे धुळेकरांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. एकीकडे उष्णतेचा पारा हा दिवसागणिक वाढत असताना वीज पुरवठा खंडित केला जातो. तर माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करणाऱ्या नागरिकांना वीज कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून धमकवले जाते. या सर्व प्रकारामुळे संतप्त होत आज (दि.२७) शिवसेनेच्या शिंदे गटाने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर “चला झोपायला एम.एस.ई. बी ऑफिसला”, असे अनोखे आंदोलन करून धडक दिली.

यावेळी वीज वितरण कंपनीच्या वतीने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलन तूर्त स्थगीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी दिली आहे.

धुळे शहरातील शिवतीर्थ नदीच्या शिवसेना कार्यालयापासून साक्रीरोड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनात शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे, मनोज कोळेकर, अनिल जगताप, कल्पेश चव्हाण,मयूर कुलकर्णी दक्षता पाटील, शेखर बडगुजर , रवी शिंदे, अरविंद सुडके, आबा कदम, शेखर बडगुजर, दिगंबर चौधरी आदी उपस्थित होते.

धुळ्यात उन्हामुळे जनतेच्या अंगाची काहीली होत असताना वीज वितरण कंपनी वीजपुरवठा खंडित करत असल्याने “चला झोपायला वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला” अशा घोषणा देत, हा मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांसह परिसरातील नागरीकांनी जोरदार घोषणाबाजी करून अधिक्षक अभियंत्यांच्या नीरज वैरागडे यांच्या दालनाबाहेर झोपत आंदोलन केले. तसेच अधिक्षक अभियंत्यास घेराव घालून वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचा, अचानक विजेचा दाब वाढण्याचा आणि त्यामुळे नागरीकांच्या घरात इलेक्ट्रीक वस्तुंचे झालेल्या नुकसानीचा जाब मनोज मोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विचारला. यावेळी अधिक्षक अभियंत्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी खाली बसून चर्चा केली, तसेच उपाययोजना करण्याचे आश्वासन देखील दिले.

हेही वाचा 

Back to top button