ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भारतीय जनता पक्षाने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाची लढाई लक्षवेधी बनवली आहे. काँग्रेसने इथे पक्षाच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवार बनविले आहे. यानिमित्ताने वकिलीचा काळा कोट बाजूला ठेवत निकम हे प्रथमच जनतेच्या न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. तर, धारावीची सारी सूत्रे अनेक वर्षांपासून आपल्या हाती ठेवणार्या वर्षा गायकवाड या शेजारच्या मतदार संघात आपले राजकीय कौशल्य आजमावणार आहेत. एका अर्थाने दोन्ही उमेदवार या मतदार संघासाठी नवीन आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारासाठी पक्षाची स्थानिक यंत्रणा राबणार त्याची सरशी, असे काहीसे या मतदार संघातील चित्र आहे.
निवडणुकांच्या रणधुमाळीत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ कायमच चर्चेत राहिला. अभिनेते आणि दिवंगत काँग्रेस नेते सुनील दत्त यांचा मतदार संघावर दीर्घकाळ प्रभाव राहिला. त्यांच्या पश्चात कन्या प्रिया दत्त 2009 साली इथे खासदार बनल्या. 2014 साली भाजपने दिवंगत प्रमोद महाजनांची कन्या पूनम यांना इथून उमेदवारी दिली. दत्त विरुद्ध महाजन या राजकीय वारसांच्या लढाईत महाजनांची सरशी झाली. काँग्रेसचा हा सुरक्षित मतदारसंघ मोदी लाटेत भेदला गेला. 2019 सालीही याचीच पुनरावृत्ती झाली. यंदा भाजपने महाजनांचा पत्ता कट करत नवा उमेदवार देण्याचा निर्णय केला. महाजनांना उमेदवारी का नाकारली, याबाबत स्थानिक पातळीवर आपापल्या पद्धतीने तर्क मांडले जात आहेत. एक हत्ती आणि चार आंधळे असाच काहीसा हा प्रकार आहे. मात्र, मोदी-शहांनी हा निर्णय घेतला असेल, तर त्यामागे काही विचार नक्की असेल, यावर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे एकमत दिसून येते.
पक्षनेतृत्वाने महाजनांना बाजूला केले. तर, प्रिया दत्त यांनी स्वतःच राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. 2014 च्या पराभवानंतर तसाही त्यांचा राजकीय अज्ञातवास सुरूच झाला होता. 2019 च्या निवडणुकांपूर्वी तर त्यांनी राजकीय निवृत्तीचाही विचार बोलून दाखविला होता. 2019 च्या पराभवानंतर तर त्या राजकीय व्यासपीठावर आल्या तर हजर असल्याची बातमी व्हावी, इतका त्यांचा जनसंपर्क दुर्मीळ झाला. त्यामुळे सुनील दत्त यांना मानणारे अनेक काँग्रेस नेते हळूहळू इतर नेत्यांच्या सावलीत विसावले. अगदी महिनाभरापूर्वी माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे एका अर्थाने 'दत्त' आणि 'महाजन' यांच्या राजकीय प्रवासाचे एक वर्तुळ पूर्ण झाले असून, राजकारणाचा नवा पट इथे मांडला जात आहे. नव्या पटावर उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात लढत दिसत असली, तरी प्रत्यक्षात पक्षयंत्रणेचा कस इथे लागणार आहे.
उज्ज्वल निकम यांची उमेदवारी घोषित होताच भाजपने मुंबईकरांसाठी लढणार्या सच्चा मुंबईकराचा हा सन्मान असल्याचे म्हटले आहे. मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी कसाब, रेल्वे स्फोटातील खटल्यात याकूब मेमनच्या फाशीसाठी निकमांच्या युक्तिवादाचा दाखला दिला आहे. शिवाय, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या शेजारच्या दक्षिण मध्य मुंबईतील धारावीच्या आमदार आहेत. त्यामुळे बाहेरचा उमेदवार हा इतरत्र दिसणारा फॅक्टर उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात चालणारा नाही. वर्षा गायकवाड धारावीच्या आमदार असल्या, तरी सध्या पक्षाच्या मुंबई अध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षसंघटनेला कामाला लावताना त्यांना फार तोशीस करावी लागणार नाही. मात्र, स्थानिक नेते नसीम खान यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यामुळे नाराज झालेल्या नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश प्रचार समितीचा राजीनामा दिला. शिवाय, स्टार प्रचारकाचा मानही भिरकावला. त्यांची नाराजी काँग्रेसला परवडणारी नाही. संपूर्ण मतदार संघात 'संपर्क' असणार्या मोजक्या काँग्रेस नेत्यांमध्ये नसीम खान यांचे नाव अगदी वरचे आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही यावर काय उत्तर देणार, हा नसीम खान यांचा सवाल आहे. आजघडीला तरी त्याचे उत्तर काँग्रेसकडे नाही. मुस्लिम मते काँग्रेसविरोधात जाणार नाहीत, हे खरे असले तरी ती मते 'पंजा'समोरील बटणापर्यंत आणावी लागतात, हे राजकीय वास्तव आहे. त्यासाठी वर्षा गायकवाडांची शक्ती पणाला लागणार आहे. जोडीलाच दलित आणि ख्रिश्चन मतांचा आधार काँग्रेसला वाटतो.
दुसरीकडे भाजप मात्र नरेंद्र मोदींच्या नावाने मते मागणार आहे. त्यासाठीच मोदीच उमेदवार समजून महिनाभर पक्षाची यंत्रणा राबते आहे. त्यातच आता उज्ज्वल निकम यांच्यासारखा मोठी ख्याती असलेला चेहरा भाजपला मिळाला आहे. त्यामुळे हक्काची मते खेचण्यासाठी आवश्यक रसद तयार असल्याची भावना पक्षात आहे. शिवाय, निकम यांना निवडून आणणे ही पक्षाच्या आमदारांची जबाबदारी बनली आहे. विशेषतः मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांना त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. दगाफटका झाल्यास विचारणा त्यांनाच होणार, याची शेलारांना पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे शेलारही कामाला लागले आहेत. मतदार संघातील समीकरणे त्यांनी हलवायला सुरू केली आहेत. त्यांनी टाकलेले डाव किती परिणामकारक आहेत, हे मतदानाच्या दिवशी दिसेल. त्यावरच निकालाचा गुलाल कोण उधळणार, हे ठरणार आहे.
आमदारांचे बलाबल
विलेपार्लेतील आमदार पराग अळवणी, वांद्रे पश्चिमेत आशिष शेलार हे भाजप आमदार आहेत. तर, चांदिवलीत दिलीप मामा लांडे, कुर्ल्यातील आमदार मंगेश कुडाळकर हे शिंदे गटात आहेत. वांद्रे पूर्वेतील आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आहेत. मात्र, त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी महिनाभरापूर्वीच अजित पवारांच्या गटाचा रस्ता पकडला. त्यामुळे झिशान हे तांत्रिकदृष्ट्याच काँग्रेसवाले आहेत. कलिनाचे आमदार विलास पोतनीस हे ठाकरे गटाचे आमदार आहे. त्यामुळे सहापैकी चार थेट आणि एक आडवळणाने महायुतीकडे, तर एक आमदार महाविकास आघाडीचा, अशी स्थिती आहे.