जळगाव: पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून दि. २३ एप्रिल रोजी रात्री घरातून आठ महिन्यांचे बाळ चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज (दि.२९) पत्रकार परिषदेत दिली.
दीपक रमेश परदेशी, (वय ३२, रा. नारायण नगर, घोडेपीर बाबा दर्गाजवळ, मोरया हॉलच्या समोर, शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ), अमित नारायण परिहार (वय ३०, रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ), कुणाल बाळू वाघ (वय १९, रा. शिंगारबडी, साकेगाव, ता. भुसावळ), बाळू पांडुरंग इंगळे (वय ५१, रा. ऑर्डन्स फॅक्टरी, वरणगाव, सुशिल नगर, दर्यापूर शिवार, ता. भुसावळ), रिना राजेंद कदम (वय ४८, रा. नारायण नगर, घोडेपीर बाबा दर्गाजवळ, मोरया हॉलच्या समोर, शिवपुर कन्हाळा रोड, भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून दि. २३ एप्रिल रोजी रात्री १.३० ते २ वाजता घरात दोन अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करुन पाळण्यात झोपलेले आठ महिन्यांचे अल्पवयीन बाळ चोरून नेले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील महिलेला मूलबाळ होत नसल्याने तिने भुसावळ येथील अलका जीवन स्पर्श फांउडेशनच्या रीना कदम हिच्याशी संपर्क साधला होता. त्यांना मुलगा दत्तक घ्यायचा होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अलका जीवन स्पर्श फांउडेशनमध्ये छापा टाकला असता अल्पवयीन बालक आढळून आले. हे बालक पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी खून, खंडणी, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी, चोरी व आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी बाळू इंगळे हे नंदुरबारमधील बिनतारी संदेश विभागामध्ये पोलीस हवालदार या पदावर कार्यरत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, पोलिस निरीक्षक किसन पाटील, बबन जगताप, विशाल पाटील, विठ्ठल फुसे, युनुस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मीक सोनवणे, दिलीप जाधव, संजय भोई, संजय तायडे, नितीन चौधरी, जगदीश भोई, राहुल महाजन, सादीक शेख, उमाकांत पाटील, रमन सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल भोई यांनी केली.
हेही वाचा