Nagaland Lok Sabha Elections 2024 : नागालँडमधील ६ जिल्ह्यांत ‘शून्य मतदान’, काय आहे कारण? | पुढारी

Nagaland Lok Sabha Elections 2024 : नागालँडमधील ६ जिल्ह्यांत 'शून्य मतदान', काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील काही मतदारसंघात मतदानाची प्रतिक्रिया पार पडली. दरम्यान देशातील एका राज्यातील किमान सहा जिल्ह्यांत ‘शून्य टक्के’ मतदान झाले आहे. ही घटना ईशान्येकडील नागालँड राज्यातील आहे. जाणून घेऊया काय आहे या मागचे नेमकं कारण? (Nagaland Lok Sabha Elections 2024)

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नागालँडच्या पूर्वेकडील सहा जिल्ह्यांतील बूथवर मतदान कर्मचाऱ्यांनी नऊ तास वाट पाहिली, परंतु परिसरातील चार लाख मतदारांपैकी एकही मतदार मतदानासाठी आला नाही. ‘फ्रंटियर नागालँड टेरिटरी’च्या मागणीसाठी दबाव निर्माण करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. निवडणूक मतदानाच्या नऊ तासांत कोणीही मतदानासाठी आले नसल्याचे सीईओ कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. याशिवाय २० आमदारांनीही मतदानाचा हक्क बजावला नाही, असेदेखील मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (Nagaland Lok Sabha Elections 2024)

‘ENPO’ या आदिवासी संघटनेचा बेमुदत संप

मीडिया रिपोर्टनुसार, ईशान्येकडील नागालँड राज्यात ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन (ENPO) या आदिवासी संघटनांनी गेल्या सात दिवसांपासून बंद पुकारला आहे. संघटनांनकडून स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. यामुळे लोकसभा मतदानादिवशीदेखील येथील मतदारांनी घरामध्येच राहणे पसंत केले. यामुळे नागालँडमधील जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रे ओस पडलेली दिसली. (Nagaland Lok Sabha Elections 2024)

मतदानावर यंत्रणा तैनात, पण, एकही मतदान नाही

सूत्रांनी सांगितले की, परिस्थिती शांततापूर्ण होती परंतु जिल्हा प्रशासन आणि इतर आपत्कालीन सेवांशी संबंधित लोक आणि वाहने वगळता रस्त्यावर लोक किंवा वाहनांची कोणतीही हालचाल नव्हती. नागालँडचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आवा लोरिंग यांनी सांगितले की, प्रदेशातील सहा जिल्ह्यांतील ७३८ मतदान केंद्रांवर रिटर्निंग अधिकारी तैनात होते. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदान झालेच नाही आणि दुपारी ४ वाजता मतदान संपल्याचे सूत्रांनी सांगितले. (Nagaland Lok Sabha Elections 2024)

नागालँडमधील ‘या’ नागा जमातीची वेगळ्या राज्याची मागणी

नागालँडमधील या जिल्ह्यांमध्ये चांग, ​​कोन्याक, संगतम, फोम, यिमखिउंग, खिमनियुंगन आणि तिखीर या सात नागा जमाती राहतात. त्यांच्या वेगळ्या राज्याच्या मागणीला या प्रदेशातील सुमी जमातीच्या एका वर्गाचाही पाठिंबा आहे. ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन या आदिवासी संघटनेने “संपूर्ण पूर्व नागालँड अधिकार क्षेत्रात गुरूवार १८ एप्रिल (गुरुवार) सायंकाळी ६ वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी पूर्ण बंद” घोषित केला होता.

सहा जिल्ह्यांमध्ये ४ लाख मतदारांनी नाकारला मतदानाचा अधिकार

नागालँडमधील एकूण १३.२५ लाख मतदारांपैकी पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये ४,००,६३२ मतदार आहेत. दरम्यान, नागालँडचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) व्यासन आर. यांनी हा बंद निवडणुकीच्या काळात अवाजवी प्रभाव पाडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत गुरुवारी रात्री ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन या संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे म्हटले आहे.

Back to top button