धुळे : नकाने तलाव गाळमुक्त करण्यासाठी अनिल गोटे यांची भावनिक साद, सोमवारी बैठक | पुढारी

धुळे : नकाने तलाव गाळमुक्त करण्यासाठी अनिल गोटे यांची भावनिक साद, सोमवारी बैठक

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीत जनतेसाठी वरदान ठरू शकेल, अशा नकाने तलावाला गाळमुक्त करणे आवश्यक आहे. हे काम कोणी एकट्याचे नसून त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी शहरातील शिवतीर्थ नजीकच्या कल्याण भवनात सकाळी दहा वाजेला धुळे जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर्स आणि मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन लोकसंग्रामचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे.

धुळे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावाचा गाळ उपसा करण्याचे काम किसान ट्रस्टच्या माध्यमातून माजी आमदार अनिल गोटे यांनी सुरू केले आहे. यंदा दुष्काळामुळे नकाने तलाव पूर्णपणे आटला आहे. अशा परिस्थितीत या तलावाला गाळमुक्त करून त्याची क्षमता वाढवल्यास धुळेकर जनतेला त्याचा उपयोग होईल, या हेतूने गोटे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आल्याने त्यांनी जनतेला एका पत्रकांन्वये आवाहन केले आहे.

धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढावी म्हणून, नकाणे तलाव गाळमुक्त करण्याचे काम दि. १० मार्च २०२४ पासून अव्याहतपणे सुरू आहे. परंतु नकाणे तलावात प्रचंड क्षमतेने गाळ साठला आहे. किमान ५० पोकलॅण्ड व ३०० डंपर सतत दोन महिने काम करतील तरच ८० टक्के गाळ काढून घेता येवू शकेल. हे काम आपल्या एकट्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पटीने जास्त आहे. अशी स्पष्ट कबूली अनिल गोटे यांनी बांधकाम व्यवसायात असलेल्या ठेकेदारांना (कॉन्ट्रॅक्टर्स) पाठवलेल्या एका विस्तृत पत्रात दिली आहे. आपल्या पत्रात अनिल गोटे यांनी म्हटले आहे. की,

‘१९७२ पेक्षा भीषण दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. ग्रामीण भागातील असंख्य गाव, वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावून टाकीत आहे. माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही तर, जनावरांसाठी कुठुन पाणी आणणार? एका हंडाभर पाण्यासाठी आपल्या माय-बहिणींना चार-चार, सहा-सहा किलोमीटर पायपीट करावी लागते. शासनाच्या वतीने टँकरने पिण्यासाठी पाणी पोहचविले जाईल. शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की, टँकर भरण्यासाठी पाणी आणणार कोठुन? जमिनीखालील पाण्याची उपलब्धता जवळ-जवळ संपुष्टात आली आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनतेतून बंधारा, पाझर तलाव, जलयुक्त शिवार, अथवा अन्य प्रकल्पातून पाणी अडविण्याचा व साठवण्याचा भरपूर प्रयत्न केला. शासकीय योजनेतून साठविलेल्या पाणी साठ्याची आजची अवस्था काय आहे? आपण स्वतः पाहतो आहोत. अनेक वर्षापुर्वी शासनाने निर्माण केलेल्या बंधाऱ्यांमध्ये, पाझर तलावांमध्ये किंवा लहान-मोठ्या धरणांमध्ये प्रचंड गाळ साठला आहे. साहजिकच पाण्याची साठवण क्षमता दिवसागणिक कमी होत गेली. साठलेल्या गाळामुळे पाण्याची पाझरण्याची क्षमताही काही प्रमाणात संपुष्टात आली आहे. जमिनीमध्ये पाणी मुरले नसल्याने विहिरींना किंवा बोअरवेल्सला पाणी येणार तरी कुठुन? याचा विचार करूनच २५ वर्षापुर्वी धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाणे तलाव गाळमुक्त करण्याची कल्पना माझ्या मनात आली. महाराष्ट्रात सर्वप्रथम मी मांडली. शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे गाळ काढण्याची माझी कल्पना काही प्रमाणात का होईना यशस्वी होवू शकली. लोकसहभागा शिवाय एवढे प्रचंड कार्य शक्यच नव्हते. लोकसहभागाचा भाग महत्वाचा विचार आहे साधारणतः सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले सुज्ञ नागरिक अशा लोकसहभागापासुन अलिप्त राहू शकत नाहीत.

२५ वर्षापुर्वी अत्यंत तुटपुंजा साधनांनी नकाणे तलाव गाळमुक्त करण्याच्या संकल्पांला राज्यभरात चांगली प्रसिध्दी मिळाली. सर्वत्र स्वागत झाले, राज्यातील काही लोकप्रतिनिधींनी गाळमुक्त कल्पनेचे अनुकरणही केले. त्याचे दृश्य परिणाम समोर आले. शेतीची उत्पादन क्षमता वाढली, यातूनच ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना शासनाने स्विकारली.

या अनुभवाच्या पार्श्वभुमीवर गोटे यांनी सर्वांना अत्यंत कळकळीची विनंती आहे.
समाज व्यवस्थेतील जबाबदारीचा भाग म्हणून आपण लोकसहभागात सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. परमेश्वर कृपेने आपणांकडे आर्थिक सुबत्ता, संपत्ती व साधने आली आहेत. उदाहरणार्थ, पोकलॅण्ड, जेसीबी, डंपर, लोडर अशा असंख्य साधनांनी आपण समृध्द झाला आहात. बंधाऱ्यामधील गाळ काढल्यानंतर वाढलेल्या पाण्याच्या साठवण क्षमतेचा लाभ सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील तसेच, शहरातील जनतेला होईल. आपल्याच माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरेल . हे सर्व आपणां सर्वांचे भाऊबंद आहेत, आपणाशी रक्ताचे नाते आहे. दृश्य अथवा अदृश्य स्वरूपाने काही अंशी का होईना त्यांच्या उपकाराचे ओझे कमी करण्याची आयती एक चांगली संधी चालून आली आहे.

सहभागातून किती महान कार्य होवू शकते याचे उदाहरण रामायणात आहे. प्रभू रामचंद्राना रावणाच्या लंकेवर पोहचण्यासाठी भारत व श्रीलंकेच्या मध्ये समुद्र आडवा होता. वानरसेनेने समुद्रात एक-एक दगड टाकून रामसेतू निर्माण केला. एक खारूताई हे सर्व बघत होती. तीनेही तोंडात एक-एक खडा धरून समुद्रात टाकला. याचा अर्थ असा की, काम कितीही मोठे आणि अवघड असले तरी, लहानतल्या लहान व्यक्तीने केलेली मदत दुर्लक्षीत करता येणार नाही. मला वाटते एवढ्या एका उदाहरणावरून आपण माझ्या म्हणण्यातील अर्थ समजून घ्याल .

आपणा सर्वांना माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे की, आपल्या साधनसंपत्तीचा सदुपयोग आपल्याच भाऊबंदाचे दुःख हलके करण्यासाठी आलेल्या परमेश्वरी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. यातून समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जी एक समाधानाची आणि आनंदाची उमटलेली पहिली रेषेचेच नाव परमेश्वर आहे .हे माझे वचन नसुन महात्मा गांधीचे बोल आहेत. या सर्व निवेदनाचा गांभिर्यपूर्वक विचार करून सोमवार दि. ०८/०४/२०२४ रोजी सकाळी १० वाजता शिवतीर्था शेजारी कल्याण भवन येथे जास्तीत जास्त ठेकेदारांनी उपस्थित असावे असे आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button