Lok Sabha Election 2024 | होऊ दे खर्च..! पण 95 लाखाच्या आत, लोकसभा निवडणुकीत प्रचार खर्चाला मर्यादा

Lok Sabha Election 2024 | होऊ दे खर्च..! पण 95 लाखाच्या आत, लोकसभा निवडणुकीत प्रचार खर्चाला मर्यादा
Published on
Updated on

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला 95 लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च याबाबतची अंतिम यादी तयार होईल त्याप्रमाणे खर्च गृहीत धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक दर निश्चितीसाठी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. (Lok Sabha Election 2024)

जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल पासून नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व उमेदवारांचे प्रतिनिधी यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती असावी म्हणून गुरुवारी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रे, नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया, तसेच उमेदवारांना आवश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थांचे दर याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महिलाकडून संचलित, दिव्यांग बांधवांकडून संचलित आणि युवकांकडून संचलित असे एकूण 66 मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.या मॉडेल मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यातील काही मतदान केंद्र महिलांकडून तर काही मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून व तरुण कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात येणार आहेत. ज्यांच्या वयाची 85 वर्ष उलटली आहेत अशा 45,000 वृद्ध मतदारांकरिता घरी बसून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा मतदारांच्या घरी मतदान कर्मचारी स्वतः घरी जाऊन पोस्टल मतदान पद्धतीने त्यांचे मतदान नोंदवून घेणार आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना मदत करण्यासाठी मदतनीस उपलब्धअसणार आहेत.निवडणूक आयोगाने जिल्ह्यात नव्याने 18 सहाय्यकारी मतदान केंद्रांना मान्यता देण्यात आल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली. नामनिर्देशन अर्ज दाखल करताना राजकीय पक्ष व उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त पक्षांना एक सूचक तर अमान्यताप्राप्त पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांना 10 सूचक असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच पक्षातर्फे दिला जाणारा एबी फॉर्म हा मूळ स्वाक्षरीचाच असणे आवश्यक आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करताना भरावी लागणारी अनामत रक्कम 25 हजार रुपये ही रोकड स्वरूपात भरणे आवश्यक आहे. खुल्या जागेकरिता एस.सी, एस. टी उमेदवारांना मात्र या रक्कमेत पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे. एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र त्यासाठी उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान 24 तास अगोदर बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. मतदान यंत्रावर असलेल्या मतपत्रिकेवर छापला जाणारा उमेदवाराचा फोटो हा स्वच्छ व अलीकडच्या तीन महिन्याच्या आतील असावा अशा सूचना देखील आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या. (Lok Sabha Election 2024)

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी (खर्च )चंद्रकांत वानखेडे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा नोडल अधिकारी राजेंद्र खैरनार, उपलेखा वित्त अधिकारी विनोद चावरिया,रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराचे प्रतिनिधी तुषार राणे, जळगाव लोकसभा उद्धव ठाकरे गटाचे विष्णू भंगाळे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अशोक लाड वंजारी,आम आदमी पक्षाचे मिलिंद चौधरी,काँग्रेस आय चे आत्माराम जाधव, भाजपाचे दीपक सूर्यवंशी, शिवसेना चे निलेश पाटील,किरण पाटील नरेंद्र टोके,बबलू सोनवणे, ऍड. आनंद मुजुमदार,नरेंद्र बोरसे,अमोल कोल्हे,आर पी बराटे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news