भारत पुढील तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल : अनुराग ठाकूर | पुढारी

भारत पुढील तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल : अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारत पुढील तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा ठाम विश्वास केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला. दहा वर्षांपूर्वी भारत अर्थव्यवस्थेबाबत अकराव्या स्थानावर होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात आपला देश पाचव्या क्रमांकावर आला असल्याचे त्यांनी सांगितले.

अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी १९ देशांमधील ३१ प्रमुख शहरांच्या १४७ अनिवासी भारतीय नेत्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. एनआरआयएमच्या मुख्य सदस्य कांचन बॅनर्जी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

ते म्हणाले की, यंदाची लोकसभा निवडणूक विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०४७ साली भारत निश्चितपणे विकसित राष्ट्र बनणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून रेल्वे, रस्ते आणि उडडाणपुलांच्या योजना रखडल्या होत्या. मोदी सरकाने त्या पूर्ण केल्या आहेत. प्रशासनात पारदर्शकता आणून ४ कोटी २० लाख बनावट रेशन कार्ड आणि ४ कोटी १० लाख बोगस गॅस कनेक्शन रद्द करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये देशात ७४ विमानतळे होती. आता ती संख्या १५० पर्यंत वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गाची लांबी ९६ हजार किलोमीटर होती. मोदींच्या काळात ती दीड लाख किलोमीटरपर्यंत वाढली आहे. आधी देशात फक्त ७ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स ) होत्या. आता त्या २२ पर्यंत पोहोचल्या आहेत. डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ७४ वरून ७०६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ईव्हीएमवर दोष हा विरोधकांचा बहाणा !

भारतात गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेतली जात आहे. काँग्रेसची सत्ता असताना ईव्हीएमला कोणाचा विरोध नव्हता. मात्र, आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असल्यामुळे विरोधकांनी आतापासूनच ईव्हीएम मशीनबद्दल ओरड सुरु केली आहे. आपला पराभव लपविण्यासाठीच विरोधकांचा हा बहाणा असल्याचे अनुराग ठाकूर यांनी अनिवासी भारतीय नेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Back to top button