धुळे : पुढारी वृत्तसेवा- प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी दीड लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना आज न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर या तिघांचे जामीन अर्ज दाखल झाले असून त्यावर सहा एप्रिल रोजी कामकाज होणार आहे. दरम्यान लाचखोरीच्या या प्रकरणामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. पोलीस प्रशासनाच्या शिस्तीला नख लावणाऱ्या कुणाचीही गयी केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. (Dhule Bribe News)
दोंडाईचा येथील एका व्यक्तीवर कारवाई करू नये ,यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सांगण्यानुसार कर्मचारी नितीन मोहने आणि अशोक पाटील या दोघांना दीड लाखाची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाई अंतर्गत पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घराची झडती घेण्यात आली. यात सुमारे 65 लाखाचे दागिने आणि पावणेदोन कोटी रुपयाचे खरेदी खत आणि अन्य दस्ताऐवज सापडले. या प्रकरणाची देखील आता पडताळणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आज या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना 16 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले आहेत. दरम्यान तिनही आरोपींच्या वतीने आज जामीन अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यावर सहा एप्रिल रोजी कामकाज होणार आहे. (Dhule Bribe News)
दरम्यान लाच या प्रकरणामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीची बैठक आयोजित केली. यात सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारींची खरडपट्टी काढण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांची दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत देखील पोलीस दलामध्ये असलेल्या गटबाजीमुळे तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात आली. जनतेची सेवा करीत असताना कोणीही लाचखोरीचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही ,असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
हेही वाचा :