मराठा उमेदवारास संभाजी ब्रिगेडचा विरोध, मतविभागणी टाळण्याचे आवाहन | पुढारी

मराठा उमेदवारास संभाजी ब्रिगेडचा विरोध, मतविभागणी टाळण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सकल मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, ही मागणी सातत्याने पुढे येत आहे. मात्र, यामुळे मतविभागणी होऊन त्याचा लाभ मराठा समाजविरोधी उमेदवारास होणार असल्याने, मराठा समाजाकडून उमेदवार देऊ नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या अभूतपूर्व मोर्चांनंतर सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार द्यावेत, अशी मागणी सातत्याने पुढे येत आहे. त्यासाठी बैठकांचे सत्रही पार पडले असून, प्रत्येक मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अहवाल मागविण्यात आले आहेत. मात्र, अशाप्रकारचे उमेदवार दिल्यास, त्याचा लाभ मराठा समाजविरोधी उमेदवाराला अधिक प्रमाणात होऊ शकत असल्याने, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, अशातही काही मंंडळी जाणीवपूर्वक सकल मराठा समाजाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभा करण्यात यावा, अशी भूमिका मांडत आहेत. त्यांची ही भूमिका संदिग्ध व अनाकलनीय आहे. कारण त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा मतदान विभागले जाऊन त्याचा फायदा सकल मराठा समाजविरोधी उमेदवारास होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मराठा समाजाने अपक्ष उमेदवार देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका संभाजी ब्रिगेडच्या वतीने मांडण्यात आली आहे.

दरम्यान, मराठा समाजाकडून लोकसभेच्या रिंगणात अपक्ष उमेदवार देणार असल्याची जरांगे-पाटील यांनी घोषणा केल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून अनेक इच्छुक पुढे आले होते. त्यांचे अहवाल जरांगे-पाटील यांच्याकडे पाठविण्यातही आले. मात्र, जरांगे-पाटील यांनी ऐनवेळी उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, अशातही काही इच्छुकांकडून प्रचाराचा नारळ फोडत सकल मराठा समाजाकडून आपण उमेदवारी करणार असल्याचे मतदारांना सांगितले जात आहे. त्यामुळेच संभाजी ब्रिगेडकडून मराठा उमेदवार न देण्याचे आवाहन केले आहे.

मतविभागणी टाळण्यासाठी मराठा समाजाने उमेदवार न देता, मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्यांना धडा शिकवाला हवा. मराठा समाजाकडून अपक्ष म्हणून उमेदवार उभे राहिल्यास, त्याचा फायदा आरक्षणविरोधी राजकारण्यांना होणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने अशा प्रकारची भूमिका जाहीर केली आहे. – संतोष गायधनी, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

हेही वाचा :

Back to top button