नाशिक : बहुगुणी मोहाचा हंगाम सुरू; कोवळ्या सोनफुलांनी आदिवासींचे चेहरे फुलले

नाशिक : जंगलात मोहाच्या झाडांना बहरलेली मोहाची फुले गोळा करतांना आदिवासी बांधव.
नाशिक : जंगलात मोहाच्या झाडांना बहरलेली मोहाची फुले गोळा करतांना आदिवासी बांधव.
Published on
Updated on


मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा जंगली वृक्ष आहे. भारतातील उष्ण प्रदेशातल्या जंगलात या वृक्षाचे प्रमाण मोठे आहे. हा वृक्ष कमीत कमी १ ते ८ डिग्री व जास्तीत जास्त ४५ ते ५० सेंटिग्रेड तापमानात सहज जगू शकतो. गोव्यात काजूची फेणी जशी असते, तशी पेठ, सुरगाण्यात मोहाचे मद्य प्रसिद्ध आहे. या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग बैलगाड्या व होड्या तयार करण्यासाठी केला जातो. याची फुले कच्चीदेखील खातात. त्याच्या पिठाच्या गोड भाकरीही केल्या जातात. मोहाच्या फुला-फळांपासून मोठा रोजगार उपलब्ध होत असल्याने त्यास आदिवासी कल्पवृक्षच मानतात.

पेठ, सुरगाणा, हरसूल, इगतपुरी, घोटी आदी भागांत या वृक्षांची वने आहेत. या फुलांना ४० ते ५० रुपये किलोचा भाव मिळतो. उन्हाचा पारा चाळिशी ओलांडून गेला असताना, आदिवासी मात्र या भागात जंगलामध्ये फुले वेचण्यात गुंतले आहेत. आदिवासी जंगल सांभाळतात, त्या बदल्यात ते जंगलातील फुले हक्काने गोळा करून उन्हाळ्यातील रोजगाराचा प्रश्न सोडवतात. उन्हाळ्यात या भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. शेतीची कामे होत नाहीत, तेव्हा मोहाची फुले हाच त्यांचा आधार ठरतो.

*रंग, तूप अन‌् इंधनही
मोहाच्या सालीपासून रंग तयार करतात. बिया वाटल्यावर तुपासारखे तेल निघते म्हणून मोहाला इंग्रजीत 'बटर ट्री' (Butter Tree) म्हणतात. फुलात साखरेबरोबरच कॅल्शियम व इतर जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन व अनेक पोषक द्रव्ये असतात. आदिवासी तांदळात मोहाची फुले शिजवून खातात. एक टन फुलांपासून ३४० लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते. इंजीनचे इंधन म्हणून या अल्कोहोलचा उपयोग होतो. गुजरातमधील संस्थेने मोहाच्या फुलांपासून जॅम आणि जेली तयार करण्याचा गृहउद्योग सुरू केला आहे.

वाढती मागणी
एका झाडापासून त्याच्या वयोमानानुसार पाच ते ३० किलोपर्यंत फुलांचे उत्पन्न मिळते. विसाव्या वर्षी ३० किलो, चाळिसाव्या वर्षी ७५ किलो व साठाव्या वर्षी १४० किलो फुलांचे उत्पन्न मोहाच्या एका वृक्षापासून मिळते. भारतात मोहाच्या फुलांचे एकूण उत्पन्न २० लाख टन आहे. या गुणकारी मोहाची फुले आता भविष्यात निर्यातदेखील होणार आहेत. अनेक विदेशी कंपन्यांकडून या फुलांना मागणी होत आहे.

एक वनस्पती अनेक लाभ
मोहाच्या बियांत २० ते २५ टक्के तेल असते. लाकडाच्या घाण्यात या बियांचे तेल काढतात. पूर्वी या तेलाचा वापर भाज्या व दिव्यासाठी व्हायचा. धुण्याचा साबण तयार करण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोहाच्या पेंडीचा धूर केल्यास साप व उपद्रवी किडे-कीटक पळतात, घराजवळ येत नाहीत असा आदिवासींचा विश्वास आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news