तर महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा | पुढारी

तर महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लाभार्थी संपर्क अभियान भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्यास महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही, असा दावा राज्याचे महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

भाजप कार्यालय ‘वसंतस्मृती’ येथे नाशिक लोकसभा क्लस्टरच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विखे-पाटील म्हणाले की, दुसऱ्याच्या तक्रारी करून अथवा उणेदुणे काढून निवडणुका जिंकण्याचे दिवस संपलेले आहेत. त्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नियोजन पद्धतीने काम करावे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व पक्षाची विकासासाठीची भूमिका पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ.भारती पवार यांनी या बैठकीस संबोधित केले. यावेळी आ. डॉ. आहेर व आ. ॲड.ढिकले यांनी त्यांच्या मतदारसंघातील पक्ष संघटना व कार्याचा आढावा सादर केला. सरचिटणीस सुनील केदार यांनी सूत्रसंचालन केले. तर सुनील बच्छाव यांनी आभारप्रदर्शन केले.

नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला : महाजन

गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, भाजपची संघटनात्मक रचना प्रचंड मोठी आहे. प्रत्येक पातळीवर प्रत्येक आघाडीवर पक्षाची यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून निवडणुका जिंकणे भाजपासाठी तसेच महायुतीच्या उमेदवारांसाठी अशक्य नाही. पण, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपला वेळ कारणी लावावा. नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार, सत्तर नगरसेवक असल्याने नाशिक हा भाजपचाच बालेकिल्ला असून, आपल्याला जो उमेदवार देण्यात येईल त्यासाठी निवडून आणायचा चंग बांधावा, असे आवाहनही महाजन यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button