Dhule News | कुडाशी शिवारात 16 कृषिपंप चोरीला; शेतकरी त्रस्त, चोर मस्त, पोलिस मात्र सुस्त | पुढारी

Dhule News | कुडाशी शिवारात 16 कृषिपंप चोरीला; शेतकरी त्रस्त, चोर मस्त, पोलिस मात्र सुस्त

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील कुडाशी शिवार व परिसरातील पांझरा नदीवरील कृषीपंप चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून चोर मात्र मस्त आहेत. तर एकाही पंपाचा शोध लागत नसल्याने पोलिस सुस्त असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. परिसरातील 12 शेतकऱ्यांचे 16 कृषी पंप पांझरा नदी काठावरून चोरीस गेले असून गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र वाढल्याने पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा,असे पत्र सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांना शिवाजी भोये यांनी पोलिस स्टेशनला दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कुडाशी शिवारातील पांझरा नदीवरील कृषीपंप चोरीच्या घटना वाढल्या असून चोर सापडत नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यात जयवंत भोये, तुकाराम अहिरे, दिलीप मावची, दिनेश मावची, वंजी कुवर, काशिनाथ अहिरे, गुलाब शिंदे, संजय अहिरे, शिवाजी भोये, देवज्या सापट्या, चुनीलाल शिंदे, धवळ्या शिंदे या शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरीस गेले आहेत. नवीन कृषी पंप घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत तसेच शेतात असलेली पिके कोमेजून जात आहेत. वाढत्या उन्हाचा फटका पिकांना बसत असून त्यात कृषी पंप चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कृषी पंप चोरी जात असल्याने शेतकरी हतबल झाला असून हे कृषी पंप चोरट्याचा अधिकाऱ्यांनी चोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य शिवाजी भोये यांनी पोलिस स्टेशनला पत्र देऊन केली आहे.

चोरांचा तपास करून शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले कृषी पंप मिळून देण्यासाठी प्रयत्न करावेत. या संदर्भात त्यांनी तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनाही माहिती देत आपणही पोलिस अधिकाऱ्यांना सांगून शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. तसेच त्यांनी या परिसरात बीट हवालदारांविषयी नाराजी व्यक्त करत कुडाशी शिवारात लक्ष घालून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा. चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्य लक्षात घेता अशा चोरट्यांचा पोलिस शोध घेऊन त्यांच्याकडून कृषी पंप मिळून द्यावे व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी शिवाजी भोये यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा –

Back to top button