Dhule News | धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित | पुढारी

Dhule News | धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे.

जिल्ह्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सीअसच्या वर गेल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत असून त्याचा शरीरावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्च महिन्यात अशी स्थिती असून एप्रिल व मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वतंत्र उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना उष्माघात कक्ष कार्यान्वीत करुन सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्याबाबत सूचित केले आहे. हवेशीर खोली, पुरेसा औषधसाठा, कक्षात पंखे, कुलरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उष्माघाताने होणारे मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये पुरेपुर उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उष्माघाताची लक्षणे –

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, चक्कर येणे, उलटी, मळमळ होणे, थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, शरीराचे तापमान वाढणे, तसेच पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे, पाय दुखणे, डोके दुखणे, निरुत्साही वाटणे.

अशी घ्या घराबाहेर पडतांना काळजी-

दुपारनंतर उन्हात जाणे टाळावे, सकाळी व संध्याकाळच्या कमी उन्हात कामे आटोपावी. सातत्याने पाणी पित राहावे. गॉगल, छत्री, टोपी घालावी किंवा पांढ-या सुती रुमालाने डोके झाकावे. काळे व भडक रंगाचे कपडे वापरु नये. तसेच सैल व पांढ-या रंगाचे कपडे वापरावेत. आरोग्यास अपायकारक असलेले शितपेय शक्यतो टाळावीत. त्यापेक्षा लिंबूपाणी, ताक, मठ्ठा, चिंचेचे पन्हे, कैरी पन्हे इत्यादीचा वापर करावा.

उष्माघात झाल्यास काय कराल-

उष्माघात झालेल्या व्यक्तीस थंड सावलीच्या ठिकाणी आणावे. कपाळावर ओल्या कापडाची घडी ठेवावी. ओल्या कपडयाने सर्व शरीर पुसावे. ओ.आर.एस., लिंबू सरबत द्यावेत. डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोचार करावा. चांगला सकस आहार द्यावा. शिळे अन्न खाणे टाळावे. ताक, लस्सी, लिंबू सरबतासारखी घरगुती पेये घ्यावीत.

उष्माघात बचावासाठी काय कराल-

उन्हाळयात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. दुपारी घराबाहेर पडू नये. कष्टाची कामे टाळावीत. तहान नसतांना वारंवार पाणी प्यावे. शेतात दुपारची कामे टाळावीत आणि झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा. पहाटे व सायंकाळच्या वेळी शेतातील कामे करावीत आणि स्वतःचा व इतरांचा बचाव करावा. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button