नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट | पुढारी

नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. विजय करंजकर हे आपलेच आहेत. पण बदलत्या राजकीय घडामोडींमुळे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषीत केली. उमेदवार दिला, आता नाशिकचा गड जिंकूनच या, अशा शब्दांत शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे नाशिकच्या शिवसैनिकांना आदेश दिला.

महाविकास आघाडीच्यावतीने ठाकरे गटाने बुधवारी(दि.२७) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी बहाल केल्यानंतर वाजे यांच्यासह जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, जयंत दिंडे, निवृत्ती जाधव, माजी महापौर विनायक पांडे, वसंत गिते, निर्मला गावित, मुशीर सय्यद, संजय चव्हाण, सचिन मराठे, अस्लम मनियार, महेश बडवे, आदींनी पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. पक्षाचे प्रवक्ते खा. संजय राऊत हेही यावेळी उपस्थित हेते. यावेळी पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल वाजे यांनी पक्षप्रमुखांचे आभार मानले. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल, अशा शब्दांत वाजे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हाप्रमुख बडगुजर व सहसंपर्कप्रमुख गायकवाड यांनी वाजे यांना विजयी करण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाचे रान करेल, असा विश्वास व्यक्त केला. यावर उमेदवार दिला, आता ताकदीने प्रचार करा. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात घेतलेले जनहिताचे निर्णय, भाजपने केलेली घरफोडी, गद्दारांनी पक्षाला दिलेला दगा जनतेपर्यंत पोहोचवून आपल्या उमेदवाराचा ताकदीने प्रचार करा, विजयी होऊन मातोश्रीवर परत या, असे आशीर्वादही उध्दव ठाकरे यांनी दिले.

हेही वाचा l

Back to top button