जागतिक रंगभूमी दिन : दर्जेदार व्यावसायिक प्रयोगांना मुकताहेत ग्रामीण रसिक

जागतिक रंगभूमी दिन : दर्जेदार व्यावसायिक प्रयोगांना मुकताहेत ग्रामीण रसिक
Published on
Updated on

पुणे : पूर्वी गावागावांत खुल्या रंगमंचावर व्यावसायिक नाटकांचे प्रयोग झाले अन् ग्रामीण नाट्यरसिकांनी या प्रयोगांना पसंतीची पावती दिली. पण, गेल्या काही वर्षांत चित्र पालटले. आत्ताच्या घडीला विविध शहरी भागांतील नाटकाचे दौरे करणेच नाट्यनिर्मात्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसून आता फक्त ठरावीक शहरांमध्येच दौरे करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील नाट्यरसिकांपर्यंत दर्जेदार व्यावसायिक नाटक पोहचत नसून ग्रामीण भागातील नाट्यरसिकांना व्यावसायिक नाट्यप्रयोगांना मुकावे लागत आहे.

आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने नाटयनिर्मात्यांशी संवाद साधला. त्यावेळी ही बाब समोर आली आहे. अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग पूर्वी ग्रामीण भागातही झाले. पण, काळाप्रमाणे नाट्यप्रयोगांचा खर्चही वाढत गेला अन् त्यामुळे ग्रामीण भागात नाटकांचे प्रयोग करणे नाट्यनिर्मात्यांसाठी परवडेनासे झाले. राज्यात नाटकांच्या दौर्‍यांची संख्याही कमी झाली आहे. कलाकारांचे मानधन, पडद्यामागील कलाकारांचे मानधन, प्रसिद्धीचा खर्च, नाट्यगृहाचे भाडे, वाहतुकीचा खर्च, असे विविध खर्च वाढल्यामुळे निर्मात्यांना नाटकांचे दौरे करणे अवघड होत असून, राज्यातील अनेक नाट्यनिर्माते जोखीम पत्करून काही शहरांमध्ये दौरे करीत आहेत.  दौर्‍यांमधील एका नाटकाच्या प्रयोगासाठी दीड ते दोन लाखांचा खर्च परवडणारा नसल्याचे नाट्यनिर्मात्यांचे म्हणणे आहे. याविषयी नाट्य व्यवस्थापक मोहन कुलकर्णी म्हणाले, अजूनही काही नाट्यनिर्मात्यांना राज्यभरात नाटकांचे प्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तरी नाटक करणे नाट्यनिर्मात्यांनी थांबविलेले नाही.

2015 व कोरोनानंतर चित्र आणखी बदलले. नाट्यनिर्मात्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आताही नाटकांचे दौरे करणे शहरी भागातच नाट्यनिर्मात्यांना परवडत नाही. नाटकाचा खर्च कमी होऊन रंगभूमीवर जुने दिवस यावेत, अशी आस आम्हा निर्मात्यांना आणि कलाकारांना आहे.

– भाग्यश्री देसाई, नाट्यनिर्मात्या, अभिनेत्री

पूर्वी राज्यभरात नाट्यप्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या परवडत होते. पण, आता नाटकांचे दौरे करणे महागले आहे. वाहतुकीच्या खर्चापासून ते कलाकारांच्या मानधनापर्यंतचा खर्च वाढला आहे. हा खर्च करायचा कुठून? हा प्रश्न निर्माते, कलाकार आणि दिग्दर्शकांसमोर आहे. खर्च कसा कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

– सत्यजित धांडेकर, नाट्य व्यवस्थापक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news