सांगोला हादरला : मोटरसायकलला कट मारल्‍याने दोन गटात राडा; भांडणात दोघांचा खून | पुढारी

सांगोला हादरला : मोटरसायकलला कट मारल्‍याने दोन गटात राडा; भांडणात दोघांचा खून

सांगोला; पुढारी वृत्तसेवा कोळे (ता. सांगोला) येथे दोन गटात मोटर सायकलला कट मारण्याच्या कारणावरून चाकू, धारदार शस्त्र, काठी, लाकडी फळीने मारामारी करण्यात आली. या घटनेत जबर मारहाणीत बाळु अलदर व सुरज रमेश मोरे यांचा खून करण्यात आला, तर दोन्ही गटातील पाच जन गंभीर जखमी झाले. या महिन्यातील तीन ठिकाणच्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून, तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवार २१ मार्च रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मायाक्का मंदिराजवळ मोटरसायकलला मोटर सायकलने कट मारली. मोटरसायकल मधून फटाक्याचा आवाज काढण्यात आला. या कारणावरून दोन गटात भांडणे झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार २२ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अर्जुन चौक कोळा येथे दोन गटात भांडणे झाली. यामध्ये चाकूने पोटात भोसकून काठीने हाताने व लाकडी फळीने दोन गटात जबर मारामारीचा प्रकार घडला. यामध्ये बाळू शामराव आलदर (रा. संत तुकाराम नगर, आलदर वस्ती कोळे ता. सांगोला) व सुरज उर्फ बंड्या रमेश मोरे (वय ३१, रा. आंबेडकर नगर, कोळे ता. सांगोला) यांचा खून झाला. हे दोघेही दोन वेगवेगळ्या गटातील आहेत.

या हाणामारीत कुंडलिक आलदर, दत्ता आलदर, विनय मोरे, रितेश काटे, सुजित काटे हे पाच जन जखमी झाले आहेत. याबाबत, कुंडलिक महादेव आलदर व विकास महादेव मोरे यांनी पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली असून, संशयित आरोपी कुंडलिक महादेव आलदर, दत्तात्रय महादेव आलदर, सागर आलदर, बाळू शामराव आलदर, विजू ज्ञानू खरात, चंद्रकांत तुकाराम आलदर तसेच दुसऱ्या गटातील बंडू सुरज मोरे छोट्या उर्फ विनय मोरे जयराम काटे, शिवराम उर्फ सुजित काटे, विकास मोरे, अभिमान मोरे यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेत दोघांना अटक केली असून, चौघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंगळवेढा, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.

याच महिन्यात कोळ्या पासून काही अंतरावर असलेल्या पाचेगाव मध्ये रेशन कार्ड च्या कारणावरून आई वडिलांचा खून केला होता, तर शिरभावी येथे महिलेचा भावाच्या मुलांनी खून केला होता. या घटना ताज्या असतानाच पुन्हा कोळा येते दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन दोघा जणांचा खून करण्यात आला. तर पाचजण जखमी झाले आहेत. अशा घटना घडत आहेत याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्‍याचे स्‍थानिकांतून बोलले जात आहे.

सांगोला तालुक्यामध्ये अवैद्य वाळू व्यवसाय, सावकारी, मटका, गुटखा, जुगार याचे प्रमाण वाढले आहे. या मधून मोठ्या प्रमाणात अवैद्य मार्गाने पैसा येत असल्याने त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारीही यामध्ये सामील असल्याने अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना सांगोला तालुक्यामध्ये होत आहेत. या घटनामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. अवैद्य व्यवसायाबाबत व अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत पत्रकार संघटनेने वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑनलाइन व प्रत्यक्ष तक्रारी देऊनही या तक्रारीची कधीही दखल घेतली गेली नाही. तालुक्यात होणाऱ्या खून, मारामारी, चोऱ्या याबाबत वरिष्ठांनी वेळीच दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button