जिल्ह्यात अधिकृत बंदूकबाजांची हजारी : हवेली, बारामतीत सर्वाधिक परवाने | पुढारी

जिल्ह्यात अधिकृत बंदूकबाजांची हजारी : हवेली, बारामतीत सर्वाधिक परवाने

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिवाला धोका असल्यास किंवा रोख रकमेची हाताळणी करणारे जिल्हा प्रशासनाकडून शस्त्र परवाना घेतात. शस्त्र परवाना घेण्यापूर्वी मुलाखत द्यावी लागते. त्यात पास झाल्यानंतरच परवाना दिला जातो. जिल्ह्यात सर्वांत जास्त शस्त्र परवाना घेणार्‍यांमध्ये हवेली तालुका असून, त्याखालोखाल बारामती तालुका आहे. शस्त्र परवाना देताना संबंधितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र अत्यावश्यक आहे किंवा कसे, याची पडताळणी केली जाते. त्यानंतरच परवाना दिला जातो. तसेच, ज्यांना परवाना हवा आहे, त्यांची पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याची पडतळणी पोलिसांमार्फत केली जाते. तसेच, एखाद्याच्या जिवाला धोका असल्यास किंवा धमकी आली असल्यास त्याची तीव्रता पाहून त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून परवाना दिला जातो.

त्याबरोबरच काही जणांना दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हाताळावी लागते. संबंधितांनाही सुरक्षितता म्हणून शस्त्र परवाना दिला जातो. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांच्या हद्दीतील नागरिकांना पोलिस प्रशासनाकडून परवाने देण्यात येतात. जिल्हा प्रशासनाने आत्तापर्यंत 1051 जणांना शस्त्र परवाने दिले. ग्रामीण पोलिस ठाण्यांकडे अर्ज केल्यानंतर सर्व अर्ज जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जातात. अर्जांची पडताळणी केल्यानंतर संबंधितांना परवाने दिले जातात किंवा नाकारले जातात. वैयक्तिक पिस्तूल बाळगण्याचा परवाना मिळण्यासाठी येणार्‍या अर्जांची संख्या मोठी असून, कठोर पडताळणीनंतरच परवाने वितरित केले जातात.

स्टेटससाठी बंदूक

स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेऊन बंदूक सोबत बाळगली जाते. विशेष म्हणजे, या पिस्तुलाचा उपयोग प्रत्यक्षात करण्याची गरज भासत नाही. यात वापरलेल्या प्रत्येक गोळीचा हिशेब द्यावा लागतो. आपल्याकडे बंदूक असल्यास लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे बंदूक परवाना मिळविण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे दिसून येत आहे.

मुलाखतीमध्ये होतात नापास

अर्ज प्रक्रिया पार पडल्यानंतर चारित्र्य पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराची मुलाखत घेतली जाते. त्यात शस्त्र का बाळगायचे आहे? त्याची कारणे योग्यरीत्या पटवून द्यावी लागतात. दिलेल्या परवान्यांपैकी दुपटीने परवाना देण्यासाठीचे अर्ज नाकारण्यात आले आहेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button