राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उद्या नाशिकमध्ये, असा असेल शहरातील यात्रा मार्ग | Bharat Jodo Nyaya Yatra | पुढारी

राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' उद्या नाशिकमध्ये, असा असेल शहरातील यात्रा मार्ग | Bharat Jodo Nyaya Yatra

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- काँग्रेस खा. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ अंतिम टप्प्यात आली असून येत्या बुधवारी व गुरुवारी जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. यात्रेबाबत जनजागृती करण्यासाठी शहर व ग्रामीण काँग्रेसतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहे. त्यात सर्व घटकांतील नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. तसेच बेरोजगारी, वाढती महागाई आदी प्रश्न मांडून नागरिकांना काँग्रेससोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Bharat Jodo Nyaya Yatra)

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेसला यश मिळावे यासाठी खा. गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. विविध प्रश्नांवर नागरिकांशी संवाद साधत आहेत. येत्या बुधवारी ते नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे दुपारी तीनला दाखल होणार आहे. तीन ते पाच त्यांचा रोड शो असून सायंकाळी त्यांचा सौंदाणे येथे मुक्काम राहणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.१४) सकाळी चांदवडला संवाद सभा असून दुपारी १२ ला पिंपळगाव बसवंत येथे येतील. त्यानंतर ओझर मार्गे ते नाशिकला द्वारका सर्कल येथून रोड शोला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांनी यात्रेच्या पुर्वतयारीस सुरुवात केली आहे. नागरिकांमध्ये यात्रेबाबत माहिती पोहचवण्यासाठी जनसंवादावर भर दिला आहे. यानिमित्ताने त्यांनी देशातील प्रश्न जनतेसमोर मांडून तसेच काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात काेणती विकास कामे केली याची माहिती देत आहेत. यात्रा मार्गात देखावे उभारले जात आहेत. (Bharat Jodo Nyaya Yatra)

असा असेल शहरातील यात्रा मार्ग (Bharat Jodo Nyaya Yatra)

द्वारका उड्डाणपुल येथून सारडा सर्कल, दुधबाजार, दामोदर थिएटर, गाडगे महाराज पुतळा, शिवाजी रोड, शालिमार येथे यात्रा येईल. शालिमार येथील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेथे एक चौकसभा होणार आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्र्यंबकनाका सिग्नल, गोल्फ क्लब मार्गे मायको सर्कल, सातपूर पर्यंत यात्रा राहिल. त्यानंतर यात्रा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाणार असून सायंकाळी त्र‌्यंबकेश्वर मंदिरात खा. गांधी हे अभिषेक करणार असून तेथून ते मोखाड्याच्या दिशेने रवाना होतील.

हेही वाचा :

Back to top button