चार दशकांनंतर प्रथमच भेटले ‘यारों के यार’! | पुढारी

चार दशकांनंतर प्रथमच भेटले ‘यारों के यार’!

दिसा-गुजरात : 1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाली, त्यावेळी अनेकांची ताटातूट झाली. अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी गेले. यातील काहींना आपल्या कुटुंबीयांपासून दूर व्हावे लागले, तर काहीजण मित्रपरिवारापासून दूर गेले. याचदरम्यान सुरेश कोठारी व एजी शकीर हे बालपणीचे दुरावलेले मित्रही अलीकडेच चार दशकांनंतर प्रथमच एकमेकांना भेटले आणि यावेळी त्यांना झालेला आनंद अर्थातच निव्वळ अवर्णनीय असाच होता!

सुरेश कोठारी व एजी शकीर हे दोघेही मूळचे गुजरातमधील दिसा येथील रहिवासी. 1947 मध्ये ते एकमेकांपासून विलग झाले, त्यावेळी ते 12 वर्षांचे होते. 1947 मध्ये पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर एका मित्राने रावळपिंडीतील आपला पत्ता मित्राकडे पोहोचवला. पण, दोन्ही देशातील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना फार काळ संपर्कात राहणे शक्य झाले नाही. नंतर 1982 मध्ये ते एकदा आणखी एका मित्राच्या माध्यमातून भेटले. त्यानंतर पुन्हा एकदा तब्बल चार दशकांच्या अंतराने या उभयतांची अमेरिकेत भेट झाली. आता एप्रिलमध्ये एका वाढदिवसाच्या निमित्ताने आणखी एकदा भेटण्याचा या दोघांचा मानस आहे.

सुरेश कोठारी यांचा नातू मेघन कोठारी आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये म्हणाला, ‘1947 मध्येच माझ्या आजोबांना रावळपिंडीतील पूर्ण पत्ता मिळाला होता; पण दोन्ही देशांमधील राजकीय ताणतणाव पाहता त्यांना इच्छा असूनही एकमेकांच्या संपर्कात राहता आले नव्हते. आता तो दुरावा यापुढे नसेल, अशी आशा वाटते.’

Back to top button