पित्याचे छत्र हरपलेलं, आई मोलमजुरी करते, आजोबा भिक्षा मागतात; तरीही जनार्दनने करुन दाखवलं, एकाचवेळी दोन पदांना घातली गवसणी | पुढारी

पित्याचे छत्र हरपलेलं, आई मोलमजुरी करते, आजोबा भिक्षा मागतात; तरीही जनार्दनने करुन दाखवलं, एकाचवेळी दोन पदांना घातली गवसणी

राजापूर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येवला तालुक्यातील राजापूर येथील पित्याचे छत्र हरपलेल्या अत्यंत गरीब कुटुंबातील मुलाने बिकट परिस्थितीवर मात करत पोलिस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली. केल्याने होत आले रे, आधी केलीचे पाहिजे या उक्तीला जगणाऱ्या जनार्दन बैरागी या युवकाचा गावकऱ्यांनी थाटामाटात सत्कार करत आनंदोत्सव साजरा केला.

जनार्दनची आई बालूताई यांनी मोलमजुरी तसेच टेलरिंग काम करून आपल्या दोन मुलांचा सांभाळ केला. त्यांना शिक्षण दिले. पितृछत्र हरपलेल्या मुलांना आईने खंबीरपणे साथ देऊन घडवले. त्यांना आजोबा हभप भीमाबाबा बैरागी व मामा गणेश बैरागी यांची साथ लाभली. भीमाबाबा आजही गावात माधवगिरी (पिठाची भिक्षा) मागून उदरनिर्वाह चालवतात. या सर्वांच्या कष्टाचे चीज जनार्दनने केले. त्याच्या कर्तृत्वाला राजापूरकरांनी सलाम केला. दिल्ली येथे पीएसआय व नागपूर येथे वनरक्षक पदालासुद्धा गवसणी घातली. एकाच वेळी दोन पदांवर यश संपादन केल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे. जनार्दन शालेय शिक्षणात प्रत्येक वर्षी त्या-त्या वर्गात प्रथमच येत होता, अशी आठवण मित्रांनी यावेळी जागवली. जनार्दनची डीजेच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर दराडे, पी. के. आव्हाड, प्रमोद बोडके, विजय वाघ, माउली महाराज, योगेश अलगट आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी सरपंच सुभाष वाघ, पोपट आव्हाड, संजय वाघ, संजय भाबड, तुळशीराम विंचू, जगदीश वाघ, दत्तू दराडे, अशोक आव्हाड, शिवाजी बोडके, शंकरराव लगट, समाधान चव्हाण, अनिल अलगट, रामकृष्ण बांगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

शिक्षणाच्या जोरावर दिल्लीपर्यंत मजल

जनार्दनचे मामा रंगकाम करतात. त्यांना तो मदत करायचा. दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचणी, कांदालागवड अशी रोजंदारीची कामेही केली. राजापूरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी येवल्याला गेला. तेथून थेट दिल्लीत राजापूरचे नाव रोशन केल्याने गावातील शनिमंदिरात नागरी सत्कार करण्यात आला. आई बालूताई यांचाही गौरव झाला.

हेही वाचा :

Back to top button