फडणवीसांनी सांगितला ‘लाल फिती’च्या कारभाराचा अनुभव | पुढारी

फडणवीसांनी सांगितला 'लाल फिती'च्या कारभाराचा अनुभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील कोस्टल रोडसाठी केंद्र सरकारसोबत झालेल्या एका बैठकीत मी नाराज झालो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करतो असं सांगितलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतानाही ५ बैठका घेतल्या तरी परवानगी मिळत नव्हती. त्यानंतर तत्कालिन मंत्री अनिल माधव दवे हे आजारी असतानाही हॉस्पिटलमधून त्या बैठकीला आले. त्यांनी बैठकीत मान्यता दिली आणि दोन दिवसात फायनल नोटीफिकेशन काढलं, असं सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या लाल फितीच्या कारभारचं कथन केले.

कोस्टल रोडच्या वरळी ते मरिन ड्राईव्हपर्यंतच्या दक्षिण मार्गिकचे आज (दि. ११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना त्यांना लालफितीच्या कारभाराचा आलेला अनुभव सांगितला. “युपीए सरकारच्या काळातील शेवटचे मुख्यमंत्री ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जायचे पण रिकाम्या हाताने माघारी यायचे. कोस्टल रोडच्या ड्राफ्ट नोटीफिकेशनमध्ये रस्त्यावरून पब्लिक ट्रांन्सपोर्ट चाललं पाहिजे यासह आणखी एक अट होती. मोदींच वेगवान सरकार असल्याने केंद्र सरकार सोबत बैठक घेऊन ती अट काढली. त्यानंतर कोस्टल रोड संदर्भात हायकोर्टात आणि सुप्रिम कोर्टातही आम्ही जिंकलो. पण आता काहीजण म्हणतात की आमच्या काळात रस्त्याचं काम झालं, पण त्यांना परवानगी देखील मिळाली नव्हती, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच कोस्टल रोड पूर्ण

उद्धव ठाकरेंनी प्रझेंटशह दाखवून दोनदा निवडणुका लढल्या. मात्र त्यांना सरकारच्या काळात परवानग्या देखील घेता आल्या नाहीत. कोस्टल रोडचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच पूर्ण झालं. असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. ते पुढे म्हणाले की, “आम्ही दुसऱ्यांच श्रेय घेणाऱ्यातले नाही. संपूर्ण कोस्टलं रोड लवकरच सुरू होईल. हा रस्ता पूर्ण झाला कारण राज्यात सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून. पण काहीजण फक्त फेसबूक लाईव्हवर श्रेय घेतात. आम्ही दुसऱ्यांच श्रेय घेणाऱ्यातले नाही, अशी टीकाही त्यांनी ठाकरे यांच्यावर केली.

४५ मिनिटांत टप्पा गाठता येणार

नरिमन पॉईंट ते पश्चिम उपनगरांत जाण्यासाठी नेहमीच असणारी वाहनांची वर्दळ कमी करून मुंबईकरांचा या मार्गावरील प्रवास अत्यंत सुकर करणाऱ्या कोस्टल रोडच्या वरळी ते मरिन ड्राईव्हपर्यंतच्या दक्षिण मार्गिकचे आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. १५ हजार कोटी रुपयांचा खर्च असलेला एकूण ३२ किलोमीटरचा हा मार्ग तयार होण्यासाठी किमान दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. सध्या या मार्गावरील प्रवासाला दोन तास लागतात. हा मार्ग पूर्णत्वास गेल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत हा टप्पा गाठता येणार आहे. आज लोकार्पण झालेला वरळी ते मरिन ड्राईव्हपर्यंतचा पहिला टप्पा १२ किलोमीटरचा आहे.

हेही वाचा : 

Back to top button