

पुढारी ऑनलाइन डेस्क ; आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने देशात १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव अद्याप नाही. महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांना किती जागा दिल्या जातील यावरुन महायुतीत घमासान सध्या सुरु आहे. यावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार गटाला व शिंदे गटाला दहापेक्षा कमी जागा मिळतील अशी माहित मिळत आहे हे खरंय का? असे विचारले असता यावर छगन भुजबळ यांनी तसे काही नसल्याचे म्हटले आहे. भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष तटकरे यांनी देखील याला नकार दिला आहे. त्यामुळे जागेबाबत काही अद्याप ठरलं नाही, चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्यावर मीडियावर चर्चा नको असे भुजबळ म्हणाले.
एकनाथ शिंदे गटाचे व आमचे सारखेच आमदार आहेत. त्यांचे आमदार मोदी लाटेवर निवडून आले आहेत. मोदींच्या लोकप्रियतेवर निवडून आले आहेत. आमचे आमदार हे त्या प्रवाहाच्या विरुद्ध निवडून आलेले लोक आहेत, हाही फॅक्टर लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे आम्ही शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्या आम्हालाही मिळाव्या अशी भूमिका ठेवली आहे. याशिवाय जो जिथून शंभर टक्के निवडून येईल त्याबाबत ते विचार करतील त्यानुसार जागावाटप होईल अशी आमची खात्री आहे.
दिंडोरीच्या जागेवर विचारले असता भुजबळ म्हणाले, दिंडोरीच्या जागेबाबात पंधरा मतदारसंघातील कार्यकर्त्योसोबत आम्ही चर्चा केली आहे. अनेक ठिकाणी 6 पैकी 4 आमदार आमचे आहेत. पूर्वी आमचे लोक निवडून आले सुद्धा आहे. सहा महसूल विभागा मध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हाही विषय समोर आला आहे.
नाशिकला जर आम्हाला जागा मिळाली तर कोण लढेल हे पक्ष ठरवेल. नाशिक शहर जिल्ह्यात आम्ही जे काम केलंय ते नाशिककरांना माहिती. नाशिकच्या जागेवर दावा आहे पण पक्ष ठरवेल कोण लढवेल. पहिलं तर जागा सुटली पाहिजे आणि नंतर उमेदवार ठरेल असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान रामदास कदम यांनी केसाने गळा कापू नका अशी टीका भाजपवर केली आहे, यावर विचारले असता तशी शार्प प्रतिक्रिया मी देणार नाही. सध्या तरी त्यावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :