रत्नदीप संस्थाध्यक्षाविरुद्ध विद्यार्थ्यांचा ठिय्या : तहसीलदारांना निवेदन

रत्नदीप संस्थाध्यक्षाविरुद्ध विद्यार्थ्यांचा ठिय्या : तहसीलदारांना निवेदन

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : रत्नदीप शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी आकारणी व इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला निवेदन देऊन न्याय मिळावा, म्हणून रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन चालू होते. याबाबत रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांनी संस्था शासन परिपत्रकाप्रमाणे, तसेच नियमाप्रमाणे फी घेत असल्याचे सांगितले. रत्नापूर (ता. जामखेड) येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील दोनशेच्या आसपास विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तीन किलोमीटर अंतर पायी चालत तहसील कार्यालयाच्या आवारात जाऊन ठिय्या आंदोलन केले. यानंतर तहसीलदार गणेश माळी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी रत्नदीप संस्थेविरोधात शैक्षणिक फीबाबत भूमिका मांडून निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, नियमाप्रमाणे परीक्षा फी घ्यावी, अतिरिक्त फी घेऊ नये, संस्थेने विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केली ती किलोमीटरप्रमाणे घ्यावी. त्याबाबत बंधन नसावे, स्नेहसंमेलनाची वर्गणी घेऊ नये. इंडस्ट्रीयल भेट जवळची घ्यावी, गणवेश आकारणी योग्य असावी. प्रवेशावेळी अकरा हजार घेतले ते परत देण्यात यावे, कॅम्पसमध्ये विनाकारण विद्यार्थिनींना थांबवून ठेवू नये, लेक्चर व प्रॅक्टिकल वेळेवर करावे, सर्व जमा केलेल्या फी परत द्यावी, कॉलेजचे प्रश्न प्राचार्यांनी सोडवणे गरजेचे असून, अध्यक्षांनी हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांची मानसिक व आर्थिक पिळवणूक करू नये आदी अशा विविध मागण्या या वेळी निवेदनात केल्या.

याबाबत तहसीलदार माळी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या वरील मागण्यांबाबत शैक्षणिक संस्थेच्या प्रशासनाला उद्या बोलावून घेऊन त्यांची भूमिका व विद्यार्थ्यांच्या तक्रारी या दोन्ही गोष्टी समजावून घेण्यात येतील. तसेच ज्या बाबी विद्यापीठाच्या अखत्यारीत आहेत त्यासाठी त्यांना कळवण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पाठीशी प्रशासन राहील, असे आश्वासन माळी यांनी विद्यार्थ्यांना दिले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत व मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीबाबत केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित महाविद्यालयास देय असलेली रक्कम विद्यार्थ्याने पुढील सात दिवसांच्या आत महाविद्यालयास जमा करणे अनिवार्य आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयाने त्यांच्याकडून विहित नमुन्यात हमीपत्र घ्यावे, असे परिपत्रक दाखवले.

– डॉ. भास्कर मोरे, अध्यक्ष रत्नदीप संस्था

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news