Lok Sabha Election 2024 : भाजप १८५ जागांवर तर काँग्रेस १३० जागांवर मंथन करणार | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भाजप १८५ जागांवर तर काँग्रेस १३० जागांवर मंथन करणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केव्हाही होण्याची शक्यता पाहता प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीला वेग दिला आहे. भाजपची उमेदवार निवडीसाठीची पुढची बैठक शुक्रवारी (८ मार्च) होणार आहे. यात महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील १८५ ते २०० जागांवर मंथन होणार असल्याचे समजते. तर त्याआधी कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक उद्या (७ मार्च) होणार असून त्यात १३० उमेदवारांची निवड अपेक्षित आहे. अर्थात, कॉंग्रेसकडून उमेदवार यादी निवडणूक घोषणेनंतरच होईल असे समजते. (Lok Sabha Election 2024)

भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजप ३०० हून अधिक जागांवर उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असलेली १९५ उमेदवारांची यादी भाजपने घोषीत केली होती. आता केंद्रीय निवडणूक समितीच्या दुसऱ्या बैठकीत सुमारे १८५ ते २०० जागांवर विचारमिनिय होईल. त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांतील जागा आहेत. मात्र, आघाडीच्या राज्यांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर पक्षाला यश मिळाले, त्याच जागांवर भाजप मंथन करेल. ज्या जागांवर मित्रपक्षांशी चर्चा झालेली नाही, त्या जागांवर सध्या निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा होणार नाही. (Lok Sabha Election 2024)

दुसरीकडे, काँग्रेसच्या उद्या होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, दिल्ली या राज्यांच्या जागांवर चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या पहिल्या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावाला मंजुरी दिली जाणार असल्याचे कॉंग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे. (Lok Sabha Election 2024)

राहुल गांधी अमेठीतूनच?

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अमेठीतून राहुल गांधींच्या नावाला मंजुरी देण्यात येणार आहे. पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत याची घोषणा केली जाणार आहे. प्रियांका वाड्रा  रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पहिल्या यादीत रायबरेलीच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याआधी त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे तपासण्याचे निर्देश काँग्रेस श्रेष्ठी आणि गांधी कुटुंबातील नेत्यांनी निवडणूक समितीला दिले आहेत. नाव जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवाराने भाजपमध्ये जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेसवरही दबाव वाढला आहे.

हेही वाचा

Back to top button