

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शालेय सहलीदरम्यान, बसमध्ये क्रीडा शिक्षकाने दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, शिक्षकाविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोक्सोनुसार विनयभंग, ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाने या शिक्षकास निलंबीत केल्याचे सुत्रांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका शाळेची सहल जानेवारी महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली होती. प्रवासादरम्यान, ५ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास भाऊसाहेब सानप (५५) या शिक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. मध्यरात्री पान खाल्ल्यानंतर बसच्या खिडकीतून बाहेर थुंकण्याच्या बहाण्याने या शिक्षकाने विनयभंग केला. त्यानुसार संशयित सानपविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो), विनयभंग व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. पीडित विद्यार्थीनी इयत्ता सातवी व आठवीतील असल्याचे समजते.
दरम्यान, सहलीनंतर विद्यार्थिनींनी पालकांना ही बाब सांगितले. शालेय व्यवस्थापनानेही चौकशी करुन संशयितास निलंबित केल्याचे समजते. परंतु, तक्रार देण्यास पीडिता व त्यांचे कुटुंबीय उशिरा पोलिसांकडे आल्याने हा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ हे तपास करीत आहेत.
हेही वाचा :