Nashik News : विभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर गढूळ पाणी ओतण्याचा प्रयत्न | पुढारी

Nashik News : विभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर गढूळ पाणी ओतण्याचा प्रयत्न

सिडको : पुढारी वृत्तसेवा- परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजयुक्त पाणी येत आहे. महाकाली चौक, आनंद नगरमध्ये ड्रेनेजची पाइपलाइन व पिण्याच्या पाण्याची लाइन एकत्र झाल्याने नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन डोळेझाकपणा करत असल्याने महिला वर्गात संताप व्यक्त केला जात असून, संतप्त झालेल्या महिलांनी थेट सिडको विभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर गढूळ पाणी ओतण्याचा प्रयत्न करीत पाण्याच्या बाटल्या टेबलावर ठेवत आंदोलन केले.

सिडकोतील महाकाली चौक, आनंद नगरमध्ये ड्रेनेजची पाइपलाइन व पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ही फुटून एकत्र झाल्यामुळे परिसरात सकाळी पिण्याच्या पाण्यासोबत ड्रेनेजचे पाणी एकत्र आल्याने नागरिकांना पाणी पिणे देखील मुश्किल झाले आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, हे दुषित पाणी पिल्याने अनेक लोक आजारी देखील पडले आहेत.

या ड्रेनेजच्या दुषित पाण्यामुळे नागरिकांचा जीव देखील जाऊ शकतो. या संदर्भात बऱ्याचवेळा तक्रारी करुन देखील अधिकारी उडवाउडीचे उत्तर देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महिलांना तीन ते चार वेळेस पाणी गाळून घ्यावे लागते. तरी देखील पाणी पिवळसर आणि दुर्गंधयुक्त येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावर मनपा प्रशासनाने ठोस कारवाई करून स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश वराडे, लक्ष्मी तांबे, सूचित्रा केदार, रूपाली सोनवणे, पूनम महाजन, सुष्मा धनवटे, सुशिला बडगूजर, सुगंधा हासे, अलका शिरसाठ, कौशल्याबाई शेळके आदींनी विभागीय अधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्या दालनात आंदोलन केले.

हेही वाचा :

Back to top button