Dhule News : परिसंवाद, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बहुभाषिक कवी संमेलनाने ग्रंथोत्सवाचा समारोप | पुढारी

Dhule News : परिसंवाद, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बहुभाषिक कवी संमेलनाने ग्रंथोत्सवाचा समारोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा-  जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी परिसंवाद, बहुभाषिक कवी संमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाने समारोप झाला. या समारोप कार्यक्रमात माजी आमदार प्रा. शरद पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोरसे, ज्येष्ठ कवी जगदीश देवपूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती ममता हटकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे यांच्यासह साहित्यीक, कवी, ग्रंथप्रेमी नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. शरद पाटील म्हणाले की, नागरिकांमध्ये वाचनाविषयी जागृती निर्माण करुन वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा, ग्रंथालय चळवळ वृद्धींगत व्हावी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, स्थानिक साहित्यीक, कवी, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने धुळे जिल्ह्यात दोन दिवशीय ग्रंथोत्सव साजरा झाला. या ग्रंथोत्सावाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर साहित्यीक, कवी घडण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी, डॉ. अनिल बैसाने, डॉ. सदाशिव सुर्यवंशी, डॉ. शशिकला पवार यांचा परिसंवाद झाला. तर प्रभा बैकर, रमेश राठोड, कमलेश शिंदे, शाहिर श्रावण वाणी, शाहिर गंभीर बोरसे, मतीन अन्वर, दत्तात्रय कल्याणकर, अप्पा खताळ, विरेंद्र बेडसे, प्रविण पवार, गुलाब मोरे, कलाम अन्वर, पुनम बेडसे, शामल पाटील, चंद्रशेखर कासार, अरविंद भामरे, सुरेश मोरे, सुनिल पाटील आदि कवींचे बहुभाषिक कवी संमेलनात संपन्न झाले.

त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी कवि संमेलनात सहभागी कवींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ कवी जगदीश देवपूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुनम बेडसे यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश भदाणे यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button