Dhule News | अहिराणी भाषा संवर्धनाची गरज : रमेश बोरसे, धुळे ग्रंथोत्सवास प्रारंभ | पुढारी

Dhule News | अहिराणी भाषा संवर्धनाची गरज : रमेश बोरसे, धुळे ग्रंथोत्सवास प्रारंभ

धुळे : पुढारी वृत्तसेवा- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविणे आवश्यक असून वाचन संस्कृती टिकविण्याबरोबरच अहिराणी भाषा संवर्धनाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोरसे यांनी व्यक्त केले.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचे उद्धाटन ग्रंथ भवन, जिल्हा ग्रंथालय कार्यालय, धुळे येथे आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर पाटील, ज्येष्ठ साहित्यिक विश्राम बिरारी, प्रा. जगदीश देवपूरकर, ज्येष्ठ शाहीर लोक कलावंत श्रावण वाणी, जयहिंद महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वर्षां शिंदे, उपप्राचार्य व्ही.एस.पवार, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, राज्य ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल सोनवणे, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे, रोहीदास हाके आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोरसे म्हणाले की, आपली मायबोली खान्देशी भाषा पटकन सर्वांना अवगत होते. खान्देशातील अहिराणी भाषेला राजभाषेचा मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करुन वाचनसंस्कृती टिकवायची असेल तर प्रत्येक शाळेत वाचनाचा तास घ्यायला पाहिजे. जेणेकरुन विद्यार्थ्यांची वाचन क्षमता वाढेल. आजच्या प्रगत आणि डिजिटल युगात ज्याप्रमाणे मराठी, इंग्रजी या भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्या बोली भाषेचा विकास होणे आवश्यक आहे. खान्देशात अनेक भाषा आहेत या सगळया भाषांना गुंफणारा मुख्य दुवा म्हणजे अहिराणी भाषा आहे. म्हणून खान्देशची मुख्य भाषा अहिराणीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्या खान्देशाला साहित्यिकांचा मोठा वारसा आहे. या खान्देशात अनेक कवी, लेखक, साहित्यीक होवून गेले आहे यांचा परिचय करुन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सागितले.

जि.प.अध्यक्षा श्रीमती देवरे म्हणाल्या की, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थीं मोबाईलमध्ये जास्त वेळ असतात. त्यांना काही आवश्यक माहिती पाहिजे असल्यास ती माहिती गुगलवर सहज उपलब्ध होत असते. परंतू चांगले ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांना आणि वाचनाला पर्याय निर्माण होवू शकलेला नाही. पुस्तकातून जी परिपूर्ण माहिती मिळते ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळू शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषेदेतील शाळेत दर शुक्रवार व शनिवारी वाचन तास साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, डिजिटल युगात विद्यार्थी हे पुस्तकांचे वाचन कमी करतात. युवकांचा मोबाईल वापरण्यात जाणारा वेळ हा आरोग्यासाठी तसेच भावी पिढीसाठी धोकादायक असून पुस्तक वाचन करणे ही काळाची गरज आहे. वाचन, लेखन, क्षमता विकसित होण्यासाठी ग्रंथोत्सवाचे महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची रुची निर्माण होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये शुक्रवार किंवा शनिवारी एक तास वाचन तास हा उपक्रम सुरु करावा. त्याचप्रमाणे मागील काळात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक शाळेपर्यंत ग्रंथ पोहचविण्यात येत होते. तसाच उपक्रम येणाऱ्या काळात जिल्हा ग्रंथालयांनी राबवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्यात. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनीही मनोगत व्यक्त केले.

ग्रंथोत्सवाचा शुभारंभ ग्रथदिंडीने जयहिंद सिनियर कॉलेज, देवपूर येथे ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोरसे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर, जयहिंद महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वर्षां शिंदे, उपप्राचार्य व्ही.एस.पवार, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, राज्य ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल सोनवणे, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे, रोहीदास हाके यांच्या उपस्थित संपन्न झाला. ही ग्रंथदिंडीत टाळ, मृदृगांसह, आदिवासी नृत्य, लेझिम नृत्य सादर करीत जयहिंद सिनिअर कॉलेज मार्गे-जयहिंद ज्युनियर कॉलेज- डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय-जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे पोहचली. या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांसह संयोजन समितीचे सदस्य व विविध शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक सहभागी झाले होते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांच्या स्टॉलचे उद्धटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर ठाकुर यांनी तर सुत्रसंचलन पुनम बेडसे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक, लेखक, साहित्यप्रेमी नागरीक, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याठिकाणी वाचनप्रेमींसाठी भव्य ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ, साहित्य व वाड्.मय विषयक पुस्तके विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश राहणार आहे. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button