Nashik News : दोन दिवसांत तीन बांधकाम मजुरांचा उंचावरून पडल्याने मृत्यू

Nashik News : दोन दिवसांत तीन बांधकाम मजुरांचा उंचावरून पडल्याने मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात गत दोन दिवसांत सुरक्षित उपाययोजनांच्या अभावामुळे तीन बांधकाम मजुरांचा उंचावरून पडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पहिल्या घटनेत महात्मानगर येथील समृद्धी हरिपाठ इमारतीत सेंट्रिंगचे काम करत असताना यशवंत किसन खाडम (३२, रा. मोरवाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) यांचा उंचावरून पडून मृत्यू झाला. ते मंगळवारी (दि. २७) सायंकाळी 6 च्या सुमारास इमारतीच्या सातव्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम करत असताना तोल गेल्याने शिडीवरून कोसळले. उंचावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या जत्रा हॉटेलजवळील इमारतीत रंगकाम करणाऱ्याचा मृत्यू झाला. विनोद श्यामा साळवे (४८, रा. आनंदवली, गंगापूर रोड) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. ते रंगकाम करत असताना तोल गेल्याने खाली पडले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि. २७) दुपारी मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच रविवारी (दि. २५) रामू लालबहादूर पंडित (४५, रा. जेलरोड) यांचा लिफ्टमधून तोल गेल्याने चैथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. हिरावाडी येथील सेव्हन ॲव्हेन्यू इमारतीत हा प्रकार घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मजुरांची सुरक्षितता ऐरणीवर

शहरात दर महिन्याला दोन ते तीन बांधकाम मजुरांचा कामाच्या ठिकाणी मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बांधकाम मजुरांना सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तसेच त्यांना हेल्मेट, जॅकेट, उंचावर काम करत असताना सुरक्षा जाळीचा अभाव दिसत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news