Nashik : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास कंटेनरने चिरडले | पुढारी

Nashik : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास कंटेनरने चिरडले

चांदवड पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील राहूड गावातून गेलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या अज्ञात तरुणास भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक देत चिरडले. या घटनेत अनोळखी तरुण गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला. या घटनेबाबत राहूडचे कामगार पोलीस पाटील एकनाथ गांगुर्डे (५४) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिल्याने कंटेनर चालक राजीव कुमार राजकिशोर यादव (२९, रा. मलकापूर टा. मऊगंज (रीवा) मध्यप्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील राहूड गावात आलेला एक अनोळखी तरुण बुधवार (दि.२१) रोजी ७.३० च्या सुमारास मुंबई आग्रा महामार्ग ओलांडत होता. यावेळी मालेगावकडून नाशिककडे भरधाव वेगात जाणारा लेलंड कंपनीचा कंटेनर (एम. एस. ४६, ए. आर. २८६२) चालक राजीव कुमार राजकिशोर यादव (२९, रा. मलकापूर टा. मऊगंज (रीवा) मध्यप्रदेश) यांचे नियंत्रण सुटून त्याने अनोळखी तरुणाला जोरदार धडक दिली. या धडकेत अनोळखी तरुणाचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन जागीच मयत झाला. यावेळी राहूड येथील गावकऱ्यांनी कंटेनर चालकास ताब्यात घेत पोलीसांच्या ताब्यात दिले. मयत अनोळखी तरुणास उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार भाऊसाहेब गुळे, पोलीस नाईक संतोष दोंदे यांनी धाव घेत पंचनामा केला आहे. या अपघातातील मयत अनोळखी तरुणास कोणी ओळखत असल्यास चांदवड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button