लासलगाव ; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात सफरचंद लागवड? कसं शक्य आहे? सफरचंद ये तर थंड प्रदेशातील फळ आहे. भारतात हिमाचल प्रदेश, काश्मिर यासारख्या थंड प्रदेशात प्रामुख्याने हे पीक घेतले जाते. मात्र नाशिकमध्ये सफरचंदाची शेती एका शेतकऱ्याने यशस्वी करुन दाखविली आहे. (Apple farming)
द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गावांना दरवर्षी अवकाळी, गारपीटीचा तडाखा बसतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. दरवर्षी शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जावे लागत असल्याने आता काही तरी वेगळा शेती प्रयोग करावा म्हणून निफाड तालुक्यातील पालखेड येथील शेतकरी भरत बोलीज यांनी सफरचंदाची लागवड केली असून या झाडांना फळ आल्याने हा वेगळा प्रयोग यशस्वी झाला आहे. (Apple farming)
निफाड तालुक्यातील पालखेड येथील साहेबराव बोलीज यांचा मुलगा भरत बोलीज हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे प्राध्यापक म्हणून कामकाज करत होते. पण कोरोना काळात त्यांची नोकरी गेली. आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. त्यानंतर वडिलोपार्जित शेती करावी पण अवकाळी, गारपीटीचा दर वर्षी तडाखा बसत असल्याने द्राक्ष बागेची नुकसान होते आणि लाखोंचा खर्च वाया जातो. त्यामुळे मग काही तरी वेगळा प्रयोग करावा अशी मनात कल्पना आली.
मग काय त्यांनी ठरवल्या प्रमाणे, हिमालयीन शिमला अँना या जातीची सफरचंदाची 30 झाडे आणली व त्याची मार्च 2023 मध्ये लागवड केली. आतापर्यंत शंभर रुपये एक झाड याप्रमाणे तीन हजार रुपये खर्च त्यांना आला. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून या झाडांवर सफरचंदांची फळे आली आहे. त्यांची हर्वेस्टिंग एप्रिल, मे महिन्यात सुरु होणार असल्याने जम्मू काश्मीर अगोदर येथील सफरचंद बाजारात दाखल होणार आहे.
माझा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत या सफरचंदाच्या झाडांच्या वाढीवर भर देणार असल्याचे शेतकरी भरत बोलीज यांनी सांगितले.
हेही वाचा :