Nashik Accident : दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू | पुढारी

Nashik Accident : दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू

देवळाली कॅम्प, पुढारी,वृत्तसेवा:- देवळाली कॅम्पकडून नाशिकरोडकडे येणाऱ्या व जाणाऱ्या दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे, तर तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प येथून शॉन मार्क बेलसेर (वय 26, रा. बार्न्स स्कुल) हा आपल्या केटीएम दुचाकी वाहनावरून नाशिकरोडकडे येत होता. त्याचवेळी ओमकार बंडू गायकवाड (वय 24, रा. मारुती मंदिरा समोर, गायकवाड गल्ली, भगूर) हा आपल्या पल्सर दुचाकीने नाशिकरोडकडून भगूर येथील घरी जात असताना हॉटेल निक्की सागर समोर त्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बार्न्स स्कुल येथील शिक्षक शॉन मार्क बेलसेर हे जागीच ठार झाले तर ओमकार गायकवाड हा गंभीर जखमी झाला. शॉन बेलसेर यास देवळाली कॅम्प छावनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर ओमकार गायकवाड यास प्रथम बिटको हॉस्पिटल व नंतर खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

विशेष म्हणजे दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले होते. रात्री उशिरा देवळाली कॅम्प पोलिसात खबर दाखल करण्यात आली. शिक्षक शॉन मार्क बेलसेर हे आपल्या वृद्ध आई सोबत बार्न्स स्कुल परिसरात राहत असल्याचे समजते. रस्ता मोठा असतांना समोरासमोर धडक कशी आणि का झाली याचा पोलीस तपास करीत आहे. अधिक तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश गिते करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button