नगरचं राजकारण; चर्चा तर होणारच ! | पुढारी

नगरचं राजकारण; चर्चा तर होणारच !

गोरक्ष शेजूळ

नगर : पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभेसोबतच आता विधानसभेसाठीही सर्वच पक्षांकडून चाचपणीला वेग आला आहे. मिनी मंत्रालयातील कारभारात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणार्‍या लोकप्रतिनिधींच्या नावांचीही यात आपसूकच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकांत जिल्हा परिषदेतील काही चेहरे दिसणार का, याकडे लक्ष असणार आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या 12 जागा आहेत. यातील नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई नीलेश लंके यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी स्वतःच निवडणूक लढविण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी उत्कंठा आहे. याशिवाय काही विधानसभा मतदारसंघांतही अनेक माजी जि.प. सदस्यांच्या नावांबाबत खलबते सुरू आहेत.

जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या माजी सभापती अनुराधा राजेंद्र नागवडे या श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. पहिल्या महिल्या उमेदवार हा टॅग लावून वर्षभरापूर्वीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद अभियान राबवले होते. जि.प. सदस्य आणि सभापती म्हणून केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सभापती काशीनाथ दाते यांचा पक्ष निश्चित नसला तरी विधानसभेसाठीची सर्व तयारी झालेली आहे. त्या दिशेने त्यांनी बांधणीही सुरू केल्याचे दिसते आहे.

जिल्हा परिषदेतून मोठा निधी मतदार संघात खर्च केलेला आहे. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा आमदार मोनिका राजळे यांनी 10 वर्षांपूर्वी पराभव केला होता. त्यानंतर जिल्हा बँकेतही त्यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे या ठिकाणाहून आता त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले यांचे नाव चर्चेत येऊ शकते. राजश्री घुले यांनी अध्यक्षपदाच्या माध्यमातून दहीगावने गटासह मतदारसंघातही मोठी विकासकामे केलेली आहेत. याच मतदारसंघात प्रभावती प्रताप ढाकणे यांचेही नाव चर्चेत येताना दिसत आहे. लाडजळगाव गटाच्या माजी सदस्य हर्षदा शिवाजीराव काकडे यांचे नावही चर्चेत आहे. भाजपचे त्यांना मिळणारे तिकीट राजळेंसाठी सोडावे लागल्याची त्या वेळी चर्चा होती. तेव्हापासून त्यांनी पक्षावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांची तयारी केली. आता शेतकर्‍यांच्या ताजनापूर प्रकल्पासाठी त्या आवाज उठवीत आहेत.

चर्चा निवडणुकीची म्हटल्यावर लोणी गटाच्या माजी सदस्य, तथा अध्यक्ष म्हणून दोन वेळा मिनी मंत्रालयाचा कारभार चालविलेल्या शालिनीताई विखे पाटील यांचे नाव येणारच ना! त्यांनी आपल्या टर्ममध्ये अनेक विकासकामे केली, मोठा जनसंपर्क तयार केला, शिवाय महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी महिला संघटन उभे केले आहे. त्यामुळेच विधान परिषदेसह नगर विधानसभा, राहुरी विधानसभा मतदारसंघातही झेडपीतील ‘या’ नावाची चर्चा आहे. भावी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे मतदार अपेक्षेने पाहत आहेत.
राजेश परजणे हे संवत्सर जि.प. गटाचे लोकप्रतिनिधी होते.

अभ्यासू आणि मुत्सद्दी नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीत आपल्या गटासह मतदारसंघात अनेक कामे खेचून आणली आहेत. आता महानंदाची ताकदही त्यांना मिळाली आहे. त्यातच विखे-कोल्हेंचे राजकीय संबंधही सर्वश्रुत आहेत. त्यामुळे झेडपीतील या चेहर्‍याला कोपरगावातून पक्षाकडूनच संधी असल्याचे बोलले जाते. याशिवाय अकोल्यातून सुनीता अशोक भांगरे, नेवाशातून तेजश्री विठ्ठलराव लंघे, नगर-पारनेरमधून प्रताप शेळके, नगर-श्रीगोंदा संदेश कार्ले, राहुरीतून धनराज गाडे, कर्जत-जामखेडमधून मंजूषा गुंड अशी एक ना अनेक नावांची चर्चा आहे. अर्थात ही चर्चा असली तरी यापूर्वीचा राजकीय इतिहास पाहता जिल्हा परिषदेतूनच मंत्रालयात पोहोचण्याचा मार्गही अनेकांना फलदायी ठरल्याचे दिसले आहे.

जगताप, राजळे, पिचड, लहामटेंनंतर कोण?
2014 ला झेडपीच्या 8 सदस्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. यापैकी राहुल जगताप, मोनिका राजळे, वैभव पिचड हे विजयी झाले होते. सुजित झावरे, बाबासाहेब तांबे, सत्यजित तांबे, राजेंद्र फाळके, दिलीप वाकचौरे त्या वेळी पराभूत झाले. त्यानंतर 2019 मधील विधानसभा निवडणुकीत डॉ. किरण लहामटे हे एकमेव झेडपी सदस्य थेट आमदार झाले. आता येणार्‍या निवडणुकांत आणखी काही चेहरे मैदानात आणि थेट मंत्रालयात दिसणार का, याकडे जनतेचे लक्ष असेल.

Back to top button