Dhule News : निजामपूर गावातील पाण्याची जीर्ण टाकी झाली धोकादायक | पुढारी

Dhule News : निजामपूर गावातील पाण्याची जीर्ण टाकी झाली धोकादायक

पिंपळनेर: (जि.धुळे)पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील निजामपूर गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी 40 वर्षे जुनी, जीर्ण व पड़की झालेली आहे. ही टाकी कोसळून दुर्घटना होऊ शकते. जीवितहानी होण्याचा धोका टाळण्यासाठी वेळीच ही टाकी पाडून नवीन बांधण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

गावातील पाण्याची टाकी साधारणतः1985 मध्ये मा. सरपंच मुरलीधर दगडू वाणी यांच्या काळात बांधण्यात आली. प्रथमताच गावासाठी बनविलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेत ही टाकी बांधण्यात आली. गेल्या चार दशकांपासून ही टाकी गावासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी कामी येत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून टाकीचे प्लास्टर निखळू लागले आहे. टाकीचा काही भाग कोसळला आहे. काही ठिकाणी लोखंड उघडे पडलेले दिसते. पिलरला तडे पडलेत. एकंदरीत टाकी धोकेदायक झालेली आहे. ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आधी या जुन्या टाकीस पाहून लगतच नवीन टाकी बांधायचे ठरले होते. पण त्यावेळी ही टाकी पाडायचे काम होऊ शकले नाही. आता अशा स्थितीत ‘या जुन्या व जीर्ण पाणी टाकीस मुक्ती मिळणार तरी कधी?’असा सवाल ऐरणीवर आला आहे.

सध्या सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेत निजामपूर गावासाठी पाण्याची एक टाकी बांधण्याची तरतूद आहे. गावाने टाकीसाठी जागा द्यावी, अशी मागणी अधिकारी हरिश्चंद्र पवार यांनी केली आहे. सरपंच प्रतिनिधी भूषण बाबूलाल वाणी यांनी ही टाकी काढण्यात येणार आहे. ती जागा जलजीवन मिशन नवीन टाकी बांधण्यास देणार येणार आहे. याशिवाय माणिकनगर किंवा लक्ष्मणनगरसाठी अजून एका टाकीची मागणी केली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा :

Back to top button