Nashik News : वणी ग्रामपंचायतीने फुलवली आमराई, चार हजार केशर जातीची रोपे बहरली

सापुतारा रस्त्यावरील वणी ग्रामपंचायतीच्या जागेत फुललेली आमराई
सापुतारा रस्त्यावरील वणी ग्रामपंचायतीच्या जागेत फुललेली आमराई

वणी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वणी ग्रामपंचायतीने अखत्यारीतील शेतीत आमराई फुलवली आहे. तसेच शेकडो सागाच्या झाडांची लागवड केली आहे. चार हजार आंब्याची झाडे, सिल्व्हर ओक, शेवगा अशा विविध झाडांनी बाग बहरली आहे. या अभिनव उपक्रमातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा स्त्रोत लाभला आहे.

यंदा आंब्याच्या मोहोराने बाग बहरून गेली आहे. वणी-सापुतारा रस्त्यावर असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या शेतात हा प्रयोग करण्यात आला आहे. शेतजमीन पडीक होती. काही भागांत कचरा डेपो आहे तसेच वहितीसाठी योग्य असलेल्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने तत्कालीन सरपंच सुनीता भरसट व उपसरपंच विलास कड यांच्या संकल्पनेतून तसेच लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट व मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचा वापर सुरू करण्यात आला. सुरुवातीला काही दिवस सोयाबीन, गहू अशी पिके घेण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर वणी गावातून शेतीसाठी जलवाहिनीची व्यवस्था करण्यात आली. अधिकची उत्पन्नवाढ करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रयोगाची व्याप्ती वाढविण्याचे निश्चित झाले. त्यातून चार वर्षांपूर्वी वासदा येथून केशर जातीच्या चार हजार आंब्याची रोपे आणून लागवड झाली. त्याची योग्य प्रकारे जोपासना झाल्याने गतवर्षापासून उत्पन्न मिळू लागले आहे.

ग्रामपंचायत मालकीची जवळपास ४० एकरांच्या आसपास जमीन असून, शेतोपयोगी जागेत ही आंब्याची बाग लावली. काही सागाची झाडेही लावली. या आंब्याच्या बागेचा लिलाव करून नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न येत्या पाच वर्षांत मिळणार आहे. क्षेत्राला चारही बाजूने कुंपण असून, अतिक्रमणाचा विषयच नाही. त्या जागेसमोरील मोकळी जागा महामार्गावर असल्याने तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा संकल्प आहे. – विलास कड, उपसरपंच वणी

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news