जळगाव | मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, सुरक्षा रक्षक, प्रशिक्षक सुविधा सुरू करा : चंद्रकांत पाटील | पुढारी

जळगाव | मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, सुरक्षा रक्षक, प्रशिक्षक सुविधा सुरू करा : चंद्रकांत पाटील

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा-  येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींच्या वसतिगृहातील मुलींसाठी रोज मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक व व्यायाम शाळेसाठी महिला प्रशिक्षक अशा विविध सुविधा सीएसआरच्या माध्यमातून सुरू करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. स्वच्छता, योग व महिला सक्षमीकरण या तीन गोष्टींवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर आहे. त्यानुसार राज्य शासन योजना राबवित आहे. तंत्रनिकेतन मधील प्रत्येक वसतिगृहात व्यायाम शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

जळगाव शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहातील व्यायामशाळा व खूल्या व्यायामशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी वसतिगृहातील मुलींशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण नाशिक विभागाचे सहसंचालक डॉ.जी.व्ही. गर्जे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.पराग पाटील, अभियांत्रिकीचे प्राचार्य एस.आर.गाजरे, मुलांच्या वसतिगृहाचे कुलमंत्री डॉ .एस.एन.शेळके, मुलींच्या वसतिगृहाचे कुलमंत्री डॉ. आर.डी.गोसावी, डॉ.अमृता कोतकर व विभाग प्रमुख उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले की, आपल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करावा, मुलींनी आपले शरीर निरोगी ठेवावे. एवढेच नाही तर योग साधना सुध्दा करावी तसेच मनाची एकाग्रता आणि मनाची शांती मिळवण्यासाठी दररोज मेडीटेशन करावे. असे आवाहन ही त्यांनी केले. मेडीटेशन करण्याच्या फायद्यावर त्यांनी यावेळी माहिती दिली.

जागतिक स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची गरज आहे त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ४ लाख युवक व युवतींना तांत्रिक कौशल्य व जर्मन भाषा विद्यापीठ स्तरावर शिकवून प्रशिक्षित केले जातील. सदर योजनेचा पहिला टप्पा में २०२४ पासून सुरु करण्यात येईल. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA) मार्फत मुलींच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या १०० किलोवॅट सोलर पॉवर प्रकल्पाची पाहणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी केली. यावेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA), जळगांव शाखेचे व्यवस्थापक शिवाजी बोडके यांनी या प्रकल्पाची त्यांना माहिती दिली.

हेही वाचा :

Back to top button