Nashik | दोन महिन्यांनंतर पुणे-इंदूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत

मनमाड : पुणे-इंदूर महामार्गांवरील रेल्वे ओव्हरब्रिज वाहतुकीसाठी फीत कापून खुला करताना आमदार सुहास कांदे.
मनमाड : पुणे-इंदूर महामार्गांवरील रेल्वे ओव्हरब्रिज वाहतुकीसाठी फीत कापून खुला करताना आमदार सुहास कांदे.

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रेल्वे ओव्हरब्रिजवर अखेर सोमवार (दि.५) पासून अवजड वाहतुकीसाठी खुला झाला. पुलाचा एक भाग कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा पूल मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. परिणामी, पुणे-इंदूर महामार्गावरील वाहतूक प्रभावित होतानाच स्थानिक स्तरावरील दळणवळणदेखील ठप्प झाले होते. आमदार सुहास कांदे यांनी तातडीने शासनाकडून तीन कोटींचा निधी मंजूर करत काम युद्धपातळीवर मार्गी लावले. त्यांच्या हस्ते फीत कापून वाहतुकीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या रेल्वे ओव्हरब्रिजचे आयुर्मान ६३ वर्षे झाले आहे. तो कमकुवत झाला आहे. त्यातच २९ नोव्हेंबरच्या पहाटे पुलाच्या पूर्व भागाकडील सरंक्षक भिंत कोसळली होती. तेव्हापासून त्यावरील वाहतूक बंद होती. परिणामी, मालेगावकडे जाणारी वाहतूक येवला, लासलगावमार्गे, तर येवल्याकडे जाणारी वाहतूक नांदगावमार्गे वळविण्यात आली होती. लांब पल्ल्याच्या वाहतूकदारांबरोबरच स्थानिकांची गैरसोय होत होती. त्यातून स्थानिक कोट्यवधींची उलाढाल प्रभावित झाली. या पुलाचे महत्त्व लक्षात घेत आमदार कांदे यांनी तातडीने तीन कोटींचा निधी मंजूर करून घेत भिंतीच्या कामाला गती दिली. युद्धपातळीवर काम पूर्ण होऊन मार्ग सर्व वाहतुकीसाठी खुला झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, अल्ताफ खान, सुनील हांडगे, फरहान खान, साईनाथ गिडगे, भाजपचे नितीन पांडे, नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

पुलाची भिंत कोसळल्याची माहिती मिळताच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली होती. त्यांनी तातडीने निधी दिला. पूल आता खुला झाला असला तरी भविष्यात अशी पुन्हा घटना झाली तर काय? असा प्रश्नच आहे. तेव्हा शहराला वळणरस्ता आणि उड्डाणपुलासाठी शासनदरबारी प्रस्ताव सादर केलाय. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. – सुहास कांदे, आमदार.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news