Nashik | शासकीय इमारतींमुळे दिंडोरी शहराला ‘वैभव’ प्राप्त | पुढारी

Nashik | शासकीय इमारतींमुळे दिंडोरी शहराला 'वैभव' प्राप्त

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या भव्य शासकीय इमारती (Government buildings) आकारास येत आहेत. तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, दुय्यम निबंधक कार्यालय, वनविभागाच्या कार्यालयांची बांधकामे प्रगतिपथावर आहेत. ही सर्व कार्यालये एकाच आवारात आल्याने नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

पोलिस ठाणे, तहसील कार्यालयालाही जागा अपुरी पडू लागल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शासनाकडून निधी मंजूर करून घेतल्याने दिंडोरी येथे भव्य उपविभागीय कार्यालयाची इमारत उभी राहिली आहे. झिरवाळ यांनी अलीकडेच अधिकाऱ्यांसमवेत या सर्व बांधकामांची पाहणी करून आढावा घेतला आहे. लवकरच या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार आहे. वनविभागाची इमारत त्यांच्या स्वतःच्या जागेत ग्रामीण रुग्णालयासमोर झाली. मात्र अन्य कार्यालयांसाठी नव्याने भव्य शासकीय इमारतींची (Government buildings) आवश्यकता निर्माण झाली होती. शासनाने २०१३ मध्ये उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे पद दिंडोरी व पेठ या दोन तालुक्यांना मंजूर केले. तेव्हापासून उपविभागीय कार्यालय येथील सिंचन वसाहतीत कार्यरत आहे. उपविभागीय कार्यालयाला स्वत:ची भव्य इमारत असावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. पोलिस ठाणे, तहसील कार्यालयालाही जागा अपुरी पडत होती. या इमारतींसाठी (Government buildings) निधी मंजूर झाल्याने दिंडोरी येथे भव्य उपविभागीय कार्यालयाची इमारत उभी राहिली आहे. आगामी काळात दिंडोरी येथे भव्य शासकीय विश्रामगृह झाले, तर नाशिकला मंत्रिगणांच्या होणाऱ्या बैठका दिंडोरीत होतील. या बैठकांचा फायदा तालुक्यातील जनतेला भविष्यात होईल.

दिंडोरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी असलेली पोलिस वसाहत जुन्या काळातील असल्याने ती मोडकळीस आली होती. येथे पोलिस कर्मचाऱ्यांना नवीन वसाहत बांधून मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. तीही पूर्ण झाली असून, नवीन वसाहतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

विविध कार्यालयांना मंजूर निधी याप्रमाणे
उपविभागीय कार्यालय : ५ कोटी ८७ लाख
तहसील कार्यालय : ४ कोटी ९७ लाख
दुय्यम निबंधक कार्यालय : ३ कोटी ७५ लाख
पोलिस निवासस्थान : ४ कोटी ९८ लाख
पोलिस ठाणे : ४ कोटी ३० लाख
शासकीय विश्रामगृह : ५ कोटी

हेही वाचा:

Back to top button