Amalner Marathi Sahitya Sammelan : विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रुढ झाला नाही: साहित्य संमेलनात खंत | पुढारी

Amalner Marathi Sahitya Sammelan : विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रुढ झाला नाही: साहित्य संमेलनात खंत

अमळनेर, पुढारी वृत्तसेवा : अजूनही विनोद ऐकला जातो. विनोद वाचला जातो. विनोदामुळे रसिक, प्रेक्षक खुशही होतात. पण तरीही विनोदी साहित्यात सकस आणि विपूल प्रमाणात लेखन झाले नाही. त्यामुळे इतर साहित्य प्रवाहाप्रमाणे विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रुढ झाला नाही, अशी खंत ‌‘मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे’, या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली. Amalner Marathi Sahitya Sammelan

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कविवर्य ना.धों. महानोर सभागृहात ‌‘मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे’ या विषयावरील परिसंवाद झाला. अकोला येथील किशोर बळी यांनी सूत्रसंचालन केले.
ठाण्याचे श्रीकांत बोजेवार अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात शिरुर ताजबंद, पुणे येथील द. मा.माने, पुणे येथील डॉ. आशुतोष जावडेकर, वणी, नाशिक येथील डॉ. दिलीप अलोणे, नंदुरबारचे प्रा. डॉ. माधव कदम यांनी सहभाग घेतला. Amalner Marathi Sahitya Sammelan

द. मा. माने यांनी विनोदी साहित्याची वाटचाल व आढावा स्वातंत्रयपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळात या स्वरुपातून मांडला.
डॉ. आशुतोष जावडेकर यांनी विनोदाचे प्रकार, उपहास कोटी, प्रहसन असे प्रकार सांगून नाट्यातून विनोद निर्मिती होते. परिस्थिती सापेक्ष विनोद निर्मिती होते. मराठी भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतील विनोदी लेखकांचे संदर्भ दिले.

डॉ. दिलीप अलोणे यांनी शालेय जीवनापासून विनोदी लेखकाची भूमिका कथन केली. तेव्हापासून विनोद आवडू लागला. विनोद समजायला लागला, लिहिलेला विनोद समजण्यासाठी कसे बुद्धीचातुर्य असले पाहिजे, हे सांगितले. चालता-बोलता विनोद घडतो, फक्त तुमची निरीक्षण शक्ती पाहिजे, असे सांगितले.

प्रा. डॉ. माधव कदम यांनी इतर साहित्यप्रवाह जसे समृद्ध झाले आहेत, तसे विनोदी साहित्य प्रवाह समृद्ध झालेला दिसत नाही. आधुनिक मराठी वाड्मयात विनोदी लेखन करणारे श्रीपाद कोल्हटकर यांचे ३७ विनोदी लेख, चिं. वि. जोशी यांची २५ पुस्तके, वि.आ. बुवा यांची १५० पुस्तके, रमेश मंत्री यांची ३५ पुस्तके अशी लक्षवेधी साहित्यसंपदा लिहिणारी अशी लेखक मंडळी कमी आहे, असे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीकांत बोजेवार म्हणाले की, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण आपल्याच आजूबाजूला पाहिले, तर विनोद हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. विनोदी नाट्य, टीव्हीवरील शो, विनोदी चित्रपटांना प्रेक्षकांची पहिली पसंती असते. सोशल मीडियावरदेखील विनोदी साहित्य व्हायरल होते. यामुळे मराठी साहित्यात विनोदाकडे अजिबात दुर्लक्ष झाले नाही, असे मतही डॉ.बोजेवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा 

Back to top button