Amalner Marathi Sahitya Sammelan : बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे, खान्देशी बोलीभाषा परिसंवादातील सूर | पुढारी

Amalner Marathi Sahitya Sammelan : बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे, खान्देशी बोलीभाषा परिसंवादातील सूर

पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीतून (जळगाव); बोली भाषांना प्राचीन इतिहास आहे. अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लूप्त होत गेल्या. आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्व प्रथम बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असा सूर खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) परिसंवादात उमटला.

कविवर्य ना.धो.महानोर सभागृह, सभामंडप क्रमांक २ मध्ये पार पडलेल्या खान्देशी बोलीभाषा परिसंवादात डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी) – कन्नड, अशोक कौतिक कोळी (तावडी) – जामनेर, डॉ. पुष्पा गावीत – (भिल्ली) – धुळे, डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली) भालोद डॉ. सविता पटेल – (गुर्जर) – नंदुरबार यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश सूर्यवंशी होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.

डॉ.सविता पटेल यांनी प्रत्येकाला आपल्या बोली भाषेचा अभिमान असला पाहिजे, असे मत नोंदवत गुर्जर भाषेचा इतिहास व सद्यस्थितीची आढावा घेतला. डॉ.मेढे यांनी संपूर्ण भारतात जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील २२० गावांमध्ये लेवा समाजाची वस्ती असल्याचे मत नोंदवले. ही भाषा उच्चारदृष्ट्या साधी आणि सोपी बोली असल्याचे सांगितले. डॉ.गावित यांनी भिल्ली बोलीभाषा अती प्राचीन असून महाभारतातही भिल्ल जमातीचा उल्लेख असल्याचे सांगितले. कौतिक कोळी यांनी तावडी भाषेचा आढावा घेत भाषेचे संवर्धन होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

डॉ.सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीभाषेवर बोलतांना ही खान्देशची मुख्य बोली भाषा आहे. या भाषेत गोडवा आहे. या भाषेला मोठा इतिहास असल्याचे सांगितले.

हेही वाचा

Back to top button