Lasalgaon News : कोण बनेगा सरपंच? लासलगावमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा | पुढारी

Lasalgaon News : कोण बनेगा सरपंच? लासलगावमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा

लासलगाव : राकेश बोरा

लासलगावच्या सरपंचपदाचा जयदत्त होळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बदललेली राजकीय परिस्थिती आणि महत्त्वाकांक्षेमुळे या निवडणुकीच्या निमित्ताने हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. होळकर-पाटील गटाकडून योगिता योगेश पाटील यांना संधी मिळू शकते. सुवर्णा जगताप यांचीसुद्धा मनोमन सरपंचपदासाठी इच्छा आहे. मात्र, पुरेसे संख्याबळ नसल्याने पडद्याआडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये होळकर-पाटील गटाचे दहा सदस्य हे निवडून आलेले होते. प्राप्त माहितीनुसार दोन्ही गटांमध्ये अडीच-अडीच वर्षांचे सरपंचपदाचे आवर्तन ठरले होते. पहिली संधी जयदत्त होळकर यांना मिळाली. पाटील गटाकडून सरपंचपदाच्या शर्यतीमध्ये योगिता पाटील यांच्या नावाची चर्चा असून, त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडते की काही वेगळी समीकरणे जुळतात, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव शहराच्या सरपंचपदी वर्णी लावण्यासाठी योगिता पाटील व सुवर्णा जगताप इच्छुक आहेत. ८ फेब्रुवारीला सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊ शकतो. यानंतर मोठ्या हालचाली घडू शकतात. मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे गाव असल्याने त्यांचेही या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे. मर्जीतील सरपंच असावा, यासाठी ते जोर लावतील, अशी शक्यता आहे.

होळकर-पाटील गटाकडे पुरेसे संख्याबळ आहे. मात्र, विरोधी गटाकडून बेरजेचे राजकारण होऊन परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न नाकारता येत नाही. गत निवडणुकीत माजी आमदार कल्याणराव पाटील, डी. के. जगताप, पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्य निवडून आले होते. मात्र, लासलगाव ग्रामीण पतसंस्था निवडणुकीत डी. के. यांनी जिवलग मित्र प्रकाश दायमा यांना केलेली मदत यामुळे माजी आमदारांची नाराजी लपून राहिलेली नाही. यातून सुवर्णा जगताप यांना सरपंचपदाचे पडलेल्या स्वप्नाला विराम बसतो की काही करिश्मा घडवून आणण्यात यशस्वी होतात, याची चर्चा सुरू आहे.

गेल्या तीन वर्षांच्या कालखंडात अनेक चढउतार आल्याने कोण-कोणाच्या सोबत आहे हे सांगणे अवघड झालेले आहे. सरपंचपदाच्या संभाव्य इच्छुक यादीमध्ये अनेक मान्यवरांचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काय तडजोडी होतात, तसेच लासलगावला दत्तक घेतले मंत्री भुजबळ यांनी काय भूमिका घेतात, याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

सरपंचपद होळकर-पाटील गटाकडे राहते की ‘साहेब’ काही करिष्मा करत धक्कातंत्र देतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणांमध्ये काहीही होऊ शकते. त्यामुळे सत्तेच्या पटलावर काय घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा :

Back to top button