नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय उच्चाधिकार समिती, ग्रामविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीची घोषणा होऊन आता दीड महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही या समित्यांची एकही बैठक अद्यापपर्यंत झालेली नाही. सिंहस्थांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया तसेच रस्ते, पूल उभारणीसाठी मोठा कालावधी लागत असल्याने महापालिकेला या समित्यांच्या बैठकांची प्रतीक्षा आहे. (Nashik Kumbh Mela 2027)
सिंहस्थ अवघ्या काही वर्षांवर येऊन ठेपला असताना, त्यासंदर्भातील कुठलीही तयारी प्रशासकीय पातळीवर होत नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशांनंतर महापालिका आयुक्तांनी सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करत ११ हजार ११७ कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला. मात्र जोपर्यंत शासनाकडून सिंहस्थ शिखर समिती, उच्चाधिकार समिती तसेच जिल्हास्तरीय समित्यांचे गठण होत नाही, तोपर्यंत या प्रारूप आराखड्याच्या निर्मितीला अर्थ नव्हता. यासंदर्भात नाशिकच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात जाग आली. दि. १४ डिसेंबर रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात प्रमुख शिखर समितीसह विविध प्रकारच्या चार समित्यांची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा केली. (Nashik Kumbh Mela 2027)
आगामी सिंहस्थात लाखो साधू-महंत व कोट्यवधी भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आराखड्यास मंजुरी व खर्चास मंजुरी देणे, नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सर्व विभागात समन्वय ठेवणे अशा प्रकारची जबाबदारी असणार आहे. या साधू-महंत व भाविकांना दळणवळण, पाणीपुरवठा, निवास, आरोग्य, विद्युत व्यवस्था पुरविणे तसेच कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी या चार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र या समित्यांच्या घोषणेला आता दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र चारपैकी एकाही समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. (Nashik Kumbh Mela 2027)
साधुग्राम, रिंगरोडच्या भूसंपादनाला लागणार वेळ
सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत तपोवनात साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. वाहतूक नियोजन सुकर व्हावे यासाठी अंतर्गत व बाह्यरिंगरोड तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर भुसंपादन करावे लागेल. यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सिंहस्थ समित्यांच्या बैठका लवकरात लवकर घेऊन यासंदर्भातील आवश्यक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :