साहित्यिकांचा कार्यक्रम साहित्यिकांबरोबरच झाला पाहिजे : अजित पवार | पुढारी

साहित्यिकांचा कार्यक्रम साहित्यिकांबरोबरच झाला पाहिजे : अजित पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा -97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होत आहे. आज या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही याठिकाणी उपस्थित होते. यावेळी बोलताना. साहित्यिकांचा कार्यक्रम साहित्यिकांबरोबरच झाला पाहिजे अशा भावना अजित पवार यांनी बोलून दाखवल्या.

साहित्यसंमेलनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे. वेळेची जाणीव आहे. वेळ भरपूर झालेला आहे. मागे विद्यार्थ्यांची किलबिल ऐकू येत आहे. त्यांना मोकळीक दिली तर बरं होईल कारण साहित्यिकांचा कार्यक्रम साहित्यिकांबरोबर झाला तर चांगला असतो असे पवार यावेळी म्हणाले.

याप्रसंगी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, नामदार गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नामदार अनिल भाईदास पाटील व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, महामंडळ अध्यक्ष उषा तांबे, समन्वयक अविनाश जोशी, डॉ. नरेंद्र पाठक, प्रकाश मोघे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी सूत्रसंचालन करणारे नाव जाहीर करण्यापूर्वीच अजित पवारांनी थेट माइकचा ताबा घेऊन आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले. खूप वेळ झाला याची जाणीव असल्याचे त्यांनी म्हणत विद्यार्थ्यांना मोकळीक द्यावी असे आयोजकांना सांगून टाकले. हा कार्यक्रम साहित्यकांचा आहे आणि तो साहित्यिकांबरोबरच झाला पाहिजे असाही सूचक टोला त्यांनी आयोजकांना लगावला.

ज्या ठिकाणी हे साहित्य संमेलन होत आहे तो सगळा आगळावेगळा इतिहास असलेला परिसर आहे. याला प्रति पंढरपूर म्हणूनही ओळखले जाते. ही भूमी सानेगुरुजींची कर्मभूमी आहे. बहिणाबाई चौधरी, ना.धो महानोर यांसारख्या निसर्ग कवींचा हा जिल्हा असल्याचे ते म्हणाले. मराठी संस्कृतीमध्ये सर्वांचे आपण आधारतिथ्य करतो तसेच इथेही होत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आजही राजकारण्यांनी पुन्हा सांभाळली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, ज्याप्रमाणे मंत्रिमंडळात आम्ही एकमेकांच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत नाही व तशी आम्ही खबरदारी घेतो माझ्याकडे आर्थिक बाजू आहे व ती मी कमी पडू देणार नाही. ग्रंथसंपदेला ही चालना मिळाली पाहिजे. साहित्य संमेलनाच्या रेसमध्ये चार प्रमुख जिल्हे होते त्यामध्ये जळगावतील अंमळनेर शहराला हा सन्मान मिळाला आहे. येत्या तीन वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शंभरावे संमेलन पार पडणार आहे. त्यावेळेस वैभवशाली परंपरा नुसार ते पार पडेल असा शब्द साहित्यिकांना त्यांनी यावेळी दिला.

साने गुरुजींच्या कर्मभूमीमध्ये उभे राहून त्यांनी सांगितले की, 26 तारखेपासून अधिवेशन व पुरवणी मागणीचे अधिवेशन होणार आहे. यावेळी तुम्हाला स्मारकाला काय पाहिजे ते समिती जाहीर करेल मात्र तुम्हाला कोणतीच कमतरता होऊ देणार नाही. साने गुरुजींच्या नावाला साजेशे असे स्मारक तयार करावे असेही ते म्हणाले. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि प्रत्येकाने त्यासाठी योगदान देणए आवश्यक आहे असेही ते यावेळी म्हणाले.

आज आधुनिक युगात संगणक मोबाईल यामुळे वाचनाची पद्धत बदललेली आहे. पुस्तकापेक्षा स्क्रीनवर वाचनाची संख्या वाढली आहे. डिजिटल क्रांती घडली आहे. याच साहित्य संमेलनामध्येही कोड स्कॅनचा उपयोग करण्यात आलेला आहे. साहित्यिक पत्रकार हे व्यक्त झाले पाहिजे त्यांनी चांगले सुचविले तर आपण त्यांचे स्वागत करू, मराठी भाषेला साजेशी अशी वास्तू लवकरच मिळणार आहे.

Back to top button