साहित्य संमेलनात नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिकांचा विशेष सहभाग | पुढारी

साहित्य संमेलनात नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिकांचा विशेष सहभाग

नंदुरबार : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शानदार सोहळा अंमळनेर येथील प.पू.संत सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत आणि पू. साने गुरूजी यांच्या कर्मभूमीत दि.२, ३, ४ फेब्रुवारी रोजी संपन्न होत. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. गिरीश महाजन, ना. अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिकांचा विविध सत्रांमधून विशेष सहभाग राहणार आहे. दि.२ रोजी आदिवासी साहित्यिक व बोलीभाषेचे कवी गुलाबसिंग वसावे रा. सावरट ‌ता. नवापूर हे ‘स्वातंत्र्यलढ्यात जनजाती समाजाचे योगदान’ या परिसंवादात’ रावलापाणी एक संघर्ष गाथा’ याविषयावर बोलणार आहेत. दि. ३ रोजी बारीपाडा ता.साक्री येथील ग्रामविकासाचे शिल्पकार चैत्राम पवार यांची विशेष मुलाखत नंदुरबार येथील जेष्ठ पत्रकार शशिकांत घासकडबी हे घेणार आहेत. बोलीभाषा या परिसंवादात गुजर बोलीभाषा यावर नंदुरबार येथील प्रा.डॉ.सविता पटेल बोलणार आहेत. तर कविसंमेलनात जेष्ठ पत्रकार कवी रमाकांत पाटील, कवी प्रा.प्रशांत बागूल यांचे काव्य वाचन होणार आहे. जेष्ठ साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे, शहादा येथील डॉ.विश्वासराव पाटील यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. समारोप दि. ४ रोजी केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या सभापती ना.डाॅ.नीलम गो-हे , शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसकर, ना.गुलाबराव पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व साहित्य प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button