सीना नदीची उगमस्थानी दुरवस्था ! सीनेला अतिक्रमण व घाणीचा विळखा | पुढारी

सीना नदीची उगमस्थानी दुरवस्था ! सीनेला अतिक्रमण व घाणीचा विळखा

शशिकांत पवार

नगर तालुका : नगर शहरात सीना नदीपात्राचे सुशोभीकरण, खोलीकरण व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. परंतु याच सीना नदीच्या उगमस्थानी सीनापात्राची दुरवस्था झाली आहे. जेऊर परिसरात सीनामाई अखेरच्या घटका मोजत आहे. घाणीचे साम्राज्य अन् अतिक्रमणांमुळे उगमस्थानाजवळ सीना नदीपात्र गिळंकृत झाले आहे.. सीना नदीचा उगम ससेवाडी येथील सीनाशंकर डोंगरातून होतो. ससेवाडी, जेऊर, पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता असा प्रवास करीत नदी नगर शहराकडे येते. उगमस्थानापासूनच नदीपात्र अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे. जेऊर येथील सीना नदीपात्र तर घाणीचे साम्राज्य आणि अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहे. अनेक ठिकाणी पात्र नावापुरतेच राहिलेले असून शेतकर्‍यांनी अतिक्रमणे केली आहेत. जेऊरची संपूर्ण बाजारपेठ सीनापात्रात अतिक्रमणात वसली आहे.

सीना नदीपात्राची उगम स्थानापासून मोजणी करून संपूर्ण सीनापात्र मोकळे करण्याची गरज आहे. मोजणी झाल्यानंतर हद्द निश्चित होईल. त्यानंतर सीना सोशोभीकरण, खोलीकरण करण्यात येईल. तसेच पात्रातील अतिक्रमणे हटविल्यास सीना नदी मोकळा श्वास घेणार आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर नदी खोलीकरण झाल्यास परिसरातील शेतकर्‍यांचाही फायदा होणार आहे. ससेवाडी येथील उगमस्थानापासून नगर शहरापर्यंत वीस किलोमीटर अंतर असलेल्या सीना नदीपात्र अतिक्रमनांनी वेढले आहे. वडगाव गुप्ता येथे नदीपात्राचे रुंदीकरण व खोलीकरण केल्यानेे परिसरातील नागरिक, शेतकर्‍यांना त्याचा मोठा फायदा झाल्याचे पहावयास मिळते. तोच पॅटर्न जेऊर, ससेवाडी, पिंपळगाव माळवी परिसरातून जात असलेल्या नदीपात्रासाठी राबविणे गरजेचे आहे. सीना नदी, तसेच उपनदी खारोळी व इतर उपनद्यांच्या पात्रांची मोजणी करून खोलीकरण केल्यास दुष्काळी पट्ट्यातील या गावांना मोठा फायदा होईल.

इमामपूरला उन्हाळ्यात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे सीना नदीची मुख्य उपनदी असलेल्या खारोळी नदीपात्राचे रुंदीकरण, खोलीकरण झाल्यास शेतकर्‍यांना निश्चितच फायदा होईल. त्यामुळे नदीपात्रांची मोजणी आवश्यक आहे.
                                                – भीमराज मोकाटे माजी सरपंच, इमामपूर

सर्वच नद्यांवर बहुतेक शेतकर्‍यांनी अतिक्रमण केले आहे. नदीपात्रांची मोजणी करून हद्द निश्चित करण्याची गरज आहे. शेतकरी आपले अतिक्रमण हटविण्यासाठी सहजासहजी तयार होत नाहीत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मोजणी करून हद्द निश्चित करावी. त्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल.
                                                              – ज्योती तोडमल सरपंच, जेऊर

Back to top button