चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बैठक | पुढारी

चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बैठक

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक विभाग, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अभ्यासकांची चाकण एमआयडीसी येथे मंगळवारी (दि. 30) बैठक पार पडली. चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांची कारणे आणि उपाययोजना, यावर बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक विभागाने एकत्रितपणे प्रयत्न करून वाहतूक कोंडी आणि अपघात टाळता येतील, असे या वेळी सांगण्यात आले. माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक पोलिस आयुक्त सतीश कसबे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौरे, मुकुंद पुराणिक, विविध कंपन्यांचे सुमारे 250 प्रतिनिधी उपस्थित होते.

माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर या वेळी म्हणाले, अपघात होण्यामागे बहुतेकवेळा माणसाचा स्वतःवरील ताबा नसणे, बेशिस्त वाहतूक, अशा गोष्टी कारणीभूत आहेत. परंतु, या अपघातांमध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर त्या व्यक्तीचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. कामगारांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण जबाबदारीने व वाहतुकीचे सर्व नियम पाळून कामावर जावे. जास्तीत जास्त काही मिनिटे उशीर होईल; पण सुरक्षित कामावर जाणे व सुरक्षित घरी पोहचणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन त्यांनी केले. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने त्यांच्या परिसरातील जे चालक वर्षभर अपघात करणार नाहीत, त्यांना त्या वर्षाचा बेस्ट चालक हा अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात यावे, असे उमराणीकर यांनी सुचविले. त्या वेळी फेडरेशनने अपघात न करणार्‍या चालकांना बेस्ट चालक अ‍ॅवॉर्ड देण्याचे मान्य केले.

 

Back to top button